नवी दिल्ली, दि.२०- शुक्रवारी सकाळीच केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक शरद पवार आणि केंद्रीय मंत्री राष्ट्रवादीचेच प्रफुल्ल पटेल यांनी आपापले राजीनामे पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याकडे सूपूर्द केले असल्याचे वृत्त आले असतानाच शरद पवार यांनी मात्र आपण राजीनामा दिलेला नाही, या बातमीचे आश्चर्य वाटले असल्याचा खुलासा केला आहे.
राष्ट्रपतीपदासाठी प्रणव मुखर्जी यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या जागी महत्त्वाच्या दुसर्या नंबरसाठी पवार यांचे नांव अपेक्षित होते. पवार वरीष्ठ नेते आहेतच पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद तीन वेळा, केंद्रीय मंत्रीमंडळात संरक्षण मंत्रालयासारखे महत्त्वाचे खाते त्यांनी यापूर्वी हाताळले आहे. इतकेच नव्हे तर कांही काळ पंतप्रधानपदासाठीचे दावेदार म्हणूनही त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. परिणामी त्यांनाही केंद्रीय मंत्रीमंडळात दुसर्या नंबरच्या स्थानाची अपेक्षा होती. मात्र, हे स्थान संरक्षणमंत्री ए.के. अँटनी यांना दिले गेल्यामुळे पवार नाराज होते. त्यातूनच त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे व सकाळी कार्यालयात जातानाही त्यांनी सरकारी गाडी न वापरता स्वत:ची खासगी गाडी वापरल्याचे वृत्त आहे. पंतप्रधानांनी अद्यापि त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. ते कदाचित आज पवार यांची भेट घेतील असेही सांगण्यात येत आहे. पवारांचे सहकारी आणि केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनीही पवारांबरोबरच त्यांच्या पदाचाही राजीनामा दिला आहे.
गुरूवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीला कृषी विभागाशी संबंधित चर्चा होणार असूनही पवार व पटेल दोघेही या बैठकीला अनुपस्थित राहिले होते. तेव्हाच पवारांची नाराजी लक्षात आली होती. इतकेच नव्हे तर गेल्या कांही दिवसांत पवार यांच्या कोणत्याच सूचना कॉंग्रेसकडून विचारात घेतल्या गेलेल्या नाहीत. राज्यपालपदासाठी त्यांनी सुचविलेली नांवे, नाबार्ड व नाफेड या संस्थांसाठी अध्यक्षपदासाठी सुचविलेली नांवे तसेच पवार यांचा ज्या प्रकल्पांशी संबंध आहे असे प्रकल्पही कॉंग्रेसने मान्य केलेले नाहीत. फॉरवर्ड ट्रेडिंग बाबतच्या आपल्या निर्णयाला पाठिंबा न देता उलट आपले पाय मागे ओढले जात असल्याचा आरोप पवार यांनी नुकताच कॅबिनेटवर केला होता. हे सारे प्रकार लक्षात घेतले तर पवारांनी राजीनामा दिला असेल अशी शक्यता दाट आहे.
कॉंग्रेसच्या नेत्यांनी मात्र राष्ट्रवादीचे केवळ नऊच खासदार असताना त्यांना दोन नंबरचे पद कसे दिले जाऊ शकेल अशी पृच्छा केली आहे. तर दुसरीकडे पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रीमंडळात बदल होणार आहेत, त्यात महत्त्वाचे खाते मिळावे म्हणून पवार ही खेळी खेळले आहेत असेही मत व्यक्त केले जात आहे.