मरिसा मेअर्स याहूची नवी सीइओ

गुगल या जगप्रसिद्ध कंपनीतील मरिसा मेअर्सची आता याहूची नवी सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली असून याहूच्या तिमाही आर्थिक ताळेबंदानंतर आज म्हणजे मंगळवारी ती या पदाची सूत्रे हाती घेत आहे. मरिसाची नियुक्ती कांहीशी आश्चर्यकारक असून याहूने एका वर्षात नेमलेली ही तिसरी सीईओ आहे. विशेष म्हणजे मरिसा याहूची सूत्रे हाती घेत असल्याच्या बातमीने याहूचा शेअर एक तासात दोन टक्कयांनी वाढून १५.९७ डॉलर्सवर गेला असल्याचेही दिसून आले आहे.

मरिसा मेअर्सची ही गुगलचीच पूर्वीपासूनची कर्मचारी असून ती गुगलमधील पहिली महिला इंजिनिअर आहे. गुगलसाठी तिने बजावलेली कामगिरी उल्लेखनीय असून गुगलच्या  फ्लॅगशीप सर्च इंजिनचे डिझाईन करण्याची जबाबदारीही तिने पार पाडली आहे. तसेच गुगलचे स्थान व स्थानिक सेवा व्यवसायात तिने मोठी कामगिरी बजावली आहे.

याहू सध्याच्या सीईओ असलेल्या लेविगशॉन यालाच कायम ठेवेल असा अंदाज जाणकार व्यक्त करत होते कारण त्याने कांही महिन्यांच्या अवधीतच कंपनीच्या ऑनलाईन कंटेंडमध्ये लक्षणीय वाढ साध्य केली आहे. याउलट मरिसा सिलीकॉन व्हॅलीत कंटेंडपेक्षा तंत्रज्ञानावर अधिक भर देणारी म्हणून परिचित आहे. मात्र ती लेविगशॉन याला कंपनीतच राहू द्यावे यासाठी प्रयत्न करेल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

मे महिन्यात  याहूनच्या स्कॉट थॉम्पसन याने त्याच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल झालेल्या वादविवादानंतर सहा महिन्यातच सीईओपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्याच्या जागी आलेल्या करोल बार्टझ याला याहूला नवसंजीवनी देण्यात अपयश आल्याने कंपनीने सप्टेंबरमध्येच त्याची हकालपट्टी केली होती. सध्या रॉस लेविगशॉनकडे सीईओ पदाची सूत्रे होती. आता मरिसाच्या कामगिरीकडे या क्षेत्रातील तज्ञांचे लक्ष लागले आहे.