
केंद्र सरकार आणि राज्य सरकारे आपापल्या परीने पर्यटन विकासावर भर देत आहेत. त्यामुळे पर्यटन व्यवसाय हा अब्जावधी रुपयांची उलाढाल करणारा प्रचंड मोठा उद्योग झालेला आहे. पर्यटनाच्या ठिकाणी तिथल्या तिथल्या ऐतिहासिक महत्वाचा विचार करून पुराण वस्तू किंवा ऐतिहासिक वस्तूंची संग्रहालये उभी केलेली असतात. अशी संग्रहालये पाहण्यासाठी लोक फार गर्दी करतात. भरपूर शुल्क आकारून तिथे पर्यटकांना प्रवेश दिला जातो आणि पर्यटकांच्या दृष्टीने विविध ठिकाणची संग्रहालये हा मोठा आकर्षणाचा विषय असतो. परंतु संग्रहालयासाठी आवश्यक वस्तूंचा संग्रह करणे आणि त्यांची व्यवस्थित मांडणी करणे ही काही सोपी गोष्ट नाही. आपण पर्यटक म्हणून कुठेही गेलो की, तिथली संग्रहालये पहात असतो, परंतु संग्रहालये उभी करणे हे एवढे कठीण काम असेल असे आपल्या लक्षात येत नाही. प्रत्यक्षात मात्र त्याचे एक विशिष्ट शास्त्र आहे, तंत्र आहे आणि त्या शास्त्राचा, तंत्राचा अभ्यास करण्यासाठी विशिष्ट अभ्यासक्रम आहेत. याच शास्त्राला म्युझिऑलॉजी असे म्हणतात.
