गुवाहाटी, १४ जुलै-आसामची राजधानी गुवाहटी येथे सोमवारी रात्री अकरावीत शिकणार्या अल्पवयीन मुलीबरोबर भररस्त्यात २० जणांनी अर्धा तास छेडछाड केल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचे एका वृत्तवाहिनेने छायाचित्रण केले. सोमवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ यूट्यूबवर टाकण्यात आल्यानंतर तीन दिवसांनी गुवाहटी पोलिसांना जाग आली असून आता सर्वच स्तरातून दबाव आल्यानंतर पोलिसांनी केवळ चारच आरोपींना अटक केली आहे.
सोमवारी रात्री ही मुलगी, तिचे चार मित्र आणि एका मैत्रिणीसोबत एका वाढदिवसासाठी बारमध्ये गेले होते. तेथे तिचे सोबतच्या मित्रांबरोबर भांडण झाले आणि ती तेथून बाहेर पडली. त्यानंतर जीएस रस्त्यावर सुमारे २० जणांच्या गटाने तिला छेडछाड करत तिचे कपडे उतरवण्याचा प्रयत्न केला व तिचे कपडेही भर रस्त्यात फाडले. तरुणीने आपल्याला सोडण्यासाठी केलेल्या विनंतीकडे लक्ष न देता या नराधमांचा जवळपास अर्धा तास हा प्रकार सुरुच होता. हे दृष्य एका वृत्तवाहिनीने कॅमेर्यात चित्रितही केले. यानंतर अर्ध्या तासाने पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या तरुणीची त्या लोकांच्या तावडीतून सुटका करून तिला कुटुंबियांच्या स्वाधीन केले.
याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून अन्य १२ जणांची ओळख पटवण्यात यश मिळाल्याचे आसामचे पोलिस महासंचालक जयंत नारायण चौधरी यांनी सांगितले. अमरज्योती कालिता, धनंजय बास्फर आणि बुबुल दास अशी अटक झालेल्यांपैकी तिघांची नावे आहेत. कालिता राज्य सरकारच्या आमट*ाॅन नावाच्या माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला असून त्याने आसामी भाषेतील टीव्ही सीरियलमध्ये पोलिसाची भूमिका केली आहे. त्याला कामावरून काढून टाकण्यात आले आहे. धनंजय सफाई कामगार आहे तर दास स्थानिक व्यापारी आहे.
राज्याचे मुख्यमंत्री तरुण गगोई यांनी ही घटना दुर्दैर्वी असल्याचे सांगून सर्व बार, डिस्को, क्लब, हॉटेल्सवर नजर ठेवण्याचे आणि गरज भासल्यास केव्हाही धाड टाकण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. राज्यातील महिला आयोगाच्या अध्यक्षा नीरा बारुह यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांच्या अहवालावरून पुढील कारवाई निश्चित केली जाईल, असे सांगितले.