युरोपात बेरोजगारी वाढण्याची संयुक्त राष्ट्रांना भीती

संयुक्त राष्ट्र दि.१२ – कर्जाच्या आणि मंदीच्या गर्तेत अडकलेल्या युरोपातील देशांनी वेळीच आर्थिक सुधारणा न केल्यास येत्या चार वर्षात या देशात  तब्बल ४५ लाख लोकांना रोजगार गमवावा लागेल असा इशारा संयुक्त राष्ट्र संघटनेने दिला आहे.
 
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने जाहीर केलेल्या ’युरोझोन जॉब क्रायसेस’ या अहवालामध्ये युरोपातील बेरोजगारीचे भयावह भविष्य मांडण्यात आले आहे. २००८ च्या जागतिक मंदीमधून युरोप अजूनही सावरलेला नाही. तर गेल्या दोन वर्षापासून युरोपीय संघातील देशांवर कर्जाचा बोजा वाढत आहे. मंदीमुळे या देशांमधील बेकारीही तितक्याच प्रमाणात वाढत आहे. यामुळे मंदीतून बाहेर पडण्यासाठी योग्यवेळी उपाययोजना न केल्यास आगामी चार वर्षामध्ये युरोपातील बेकारी आणखी वाढणार असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
 
आर्थिक सुधारणा आणि धोरणात्मक बदल न केल्यास पुढच्या चार वर्षात युरोपात ४५ लाख लोक बेरोजगार होतील, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. बेरोजगारी वाढल्यास समाजाचा या देशांतील सरकारवरचा, आर्थिक प्रणाली आणि युरोपीय संस्थेवरचा विश्वास उडेल अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

अर्थव्यवस्था पूर्वपदावर यावी यासाठी काटकसर करण्याचे निर्णय घ्यावे लागतील. तसेच गुंतवणूक वाढवण्यासाठीही देशांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. जागतिक मंदीच्या नंतर युरोपातील बेरोजगार लोकांची संख्या वाढली आहे. या वर्षाच्या सुरवातीपासून युरोपातील एक कोटी ७४ लाख लोक बेरोजगार झाले आहेत. सध्या युरोपातील बेरोजगारीचा निर्देशांक २२ टक्के आहे. यामध्ये इटली, पोर्तुगाल, ग्रीस, स्पेन या देशांमध्ये बरोजगारीचे प्रमाण ५० टक्क्याहून अधिक आहे.