न्यूयॉर्क दि.११- एखादी कार जास्तीत जास्त किती मैल धावू शकते याचा कांही अंदाज करता येतोय ? नाही ? मग आता अंदाज बांधत बसू नका तर आम्ही सांगतोय त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवा. १९६६ सालातल्या, दोन दरवाजे असलेल्या या छोटयाश्या ,लाल रंगाच्या व्होल्व्होने आत्तापर्यंत चक्क सत्तावीस लाख मैलांहून अधिक प्रवास केला असून पुढील वर्षात ती तीस लाख मैलांचा टप्पा गाठेल असा विश्वास तिचा मालक निवृत्त शाळामास्तर आयर्विन गॉर्डन याने व्यक्त केला आहे. व्होल्व्हो पी १८००एस या मॉडेलची ही गाडी तिच्या या अनोख्या प्रवासाबद्दल गिनीज बुकमध्येही नोंदविली गेली आहे. या गाडीने केलेला प्रवास ११७७ पृथ्वी प्रदक्षिणा होतील इतक्या अंतराचा आहे.
लाँग आयलंडचा रहिवासी असलेला आयर्विन सांगतो, माझ्या गाडीला तीस लाख मैलाचा प्रवास करण्यास आता ३४ हजार मैल धावणे बाकी आहे. बहात्तर वर्षाच्या आयर्विनची ही गाडी खर्या अर्थाने सांगाती असून तो तिला कुठेही, कधीही नेतो. हाय मायलेज व्हेईकल कॅटेगरीत ही गाडी २००२ सालापासून दरवर्षी गिनीज बुक्समध्ये नोंदविली जात आहे. आयर्विनने ही गाडी ३०जून १९६६ ला वयाच्या पंचविसाव्या वर्षी ४१५० डॉलर्सला खरेदी केली. खरं तर त्याला घ्यायची होती कन्व्हर्टिबल व्होल्व्हो आणि तीही एअरकंडिशण्ड. पण तिची किंमत जास्त होती. म्हणून त्याने ही व्होल्व्हो घेतली खरी पण त्यासाठीही त्याला वर्षाचा पगार खर्चावा लागला. शिवाय एफएम रेडिओसाठी १० डॉलर्स जास्त मोजावे लागले. अर्थात तेव्हा १० डॉलर्सही मोठी रक्कम होती असे तो सांगतो.
या गाडीवर आयर्विनचा जीव आहे. तो सांगतो, या गाडीत माझ्यासाठी पुरेशी जागा आहे. पुढच्या रिकाम्या जागेत मायलेज पेपर्सनी आपला जम बसविला आहे तर मागच्या जागेत या गाडीसाठी लागणारे सर्व सुटे भाग आरामात नांदत आहेत. कधी कुठे, कुठला भाग लागेल याचा अंदाज येत नसल्याने आयर्विन या गाडीसाठी लागणारे सगळे सुटे भाग बरोबर घेऊनच प्रवास करतो. या गाडीतून रस्त्यावरून प्रवास करणे अतिशय आनंद देणारे आहे असे सांगून तो म्हणतो की आजही अगदी कॉफी प्यायलाही मी ही गाडी घेऊन दूरवर जातो. त्याच्या दोन मुली मोठ्या झाल्याने आता या गाडीत बसू शकत नाहीत पण लहान असताना त्याही या गाडीतील प्रवासी असायच्या.
आयर्विनने गेल्याच महिन्यात या गाडीतून मॉनट्रियल, टेक्सास व मिशिगनचा प्रवास केला आहे. तो सांगतो पहिल्या १० लाख मैलांच्या प्रवासासाठी त्याला २१ वर्षे लागली मात्र त्यानंतर पंधरा वर्षातच पुढचा १० लाख मैलांचा प्रवास झाला. वर्षाला साधारणपणे ८५ हजार ते १ लाख मैल ही गाडी तो चालवितो आणि यातील बहुतेक ट्रीप ऑटो शो साठीच केलेल्या आहेत. ३० लाख मैलाचा टप्पा ही गाडी नक्कीच पार करेल असा आयर्विनला विश्वास आहे.