हिलरी क्लिंटन यांची लाओसला ऐतिहासिक भेट

लाओस दि.११- अमेरिकेच्या सेक्रेटरी ऑफ स्टेट हिलरी क्लिंटन यांनी बुधवारी लाओस येथे चार तासांची भेट दिली. व्हिएटनाम युद्धसमाप्तीनंतर गेल्या सत्तावन वर्षात लाओसला भेट देणार्‍या त्या पहिल्याच अमेरिकन मंत्री असल्याने या भेटीला ऐतिहासिक महत्त्व दिले जात आहे. पारंपारिक जांभळे सिल्कचे ड्रेस घातलेल्या मुलींनी हिलरी यांचे विमानतळावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

हिलरी केवळ चार तासांच्या भेटीवर लाओसल्या गेल्या असल्या तरी लाओसवासियांसाठी ही भेट फार महत्त्वाची आहे. व्हिएटनाम युद्ध समाप्तींनंतर शिल्लक राहिलेला दारूगोळा उचलणे व युद्धात बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी खोदकाम करणे तसेच वादग्रस्त धरणाबाबत या भेटीत विचारविनिमय केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

लाओस मध्ये मेकाँग नदीवर मोठे धरण उभारणीचे काम सुरू केले असून त्याला पर्यावरणवादी आणि खुद्द सरकारकडूनच विरोध केला जात आहे. या धरणामुळे ६० दशलक्ष नागरिकांचे नुकसान होणार असून त्यांचा हा मुख्य जलमार्गच बंद पडणार आहे. मात्र गतवर्षी बाली येथे झालेल्या बैठकीत हिलरींनी धरणाचे समर्थन केले होते. परराष्ट्र मंत्री सिसोलिथ यांच्या आमंत्रणावरून हिलरी येथे आल्या असून त्या सिसोलिथ तसेच पंतप्रधानांचीही भेट घेणार आहेत. १९७५ सालात कम्युनिस्ट बंडखोरांनी राजसत्ता दूर सारून येथील सत्ता ताब्यात घेतली होती.

अमेरिकेचा या देशाशी २००४ पासून सुरळीत व्यापार सुरू असून दरवर्षाला या देशाला अमेरिकेकडून २१ दशलक्ष डॉलर्सची मदत दिली जाते. जगातील सर्वात गरीब देश असलेल्या लाओसची लोकसंख्या ६.५ दशलक्ष असून त्यांना आंतरराष्ट्रीय व्यापार वाढविण्याची तसेच जागतिक व्यापार संघटनेचे सदस्य होण्याची इच्छा आहे. हिलरी यांच्यापूर्वी १९५५ साली जॉन फोस्टर यांनी ते अमेरिकेचे सेक्रेटरी असताना या देशाला भेट दिली होती.

Leave a Comment