नाना होणार पोलिसांचा ब्रँड ऍम्बॅसिडॉर

पुणे, दि. ११ – शाळेत असताना तर, मी आई-वडील आणि शिक्षकांना घाबरायचो. मास्तरांना मुलांचे मुस्काट फोडण्याचा अधिकार असायचा. ते माझ्या हिताचे होते याची मला जाणीव असायची. मास्तरही केव्हाही हात साफ करायला बरे म्हणून अगदी प्रेमाने मला त्यांच्याजवळ बसवून घ्यायचे. आता मी चित्रपटात जे संवाद म्हणतो तसे लहानपणी पाठ केले असते तर, मार्क मिळाले असते. पण, त्यावेळचा हूडपणा कदाचित आता उपयोगाला येत असावा, असा थेट संवाद साधत नाना पाटेकर बालपणीच्या आठवणीत रमला. जगण्यासाठी झिंग हवी. पण, ती व्यसनाची कशाला, अशी भावना नानाने यावेळी व्यक्त केली.

पुणे शहर पोलिस आणि मुक्तांगण मित्र यांच्यातर्फे आयोजित जागतिक अंमली पदार्थ विरोधी जनजागरण कार्यक्रमाचा समारोप नाना पाटेकर याच्या उपस्थितीत झाला. पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, सहआयुक्त संजीवकुमार सिंघल, अतिरिक्त आयुक्त अनंत शिंदे, उपायुक्त संजय शिंदे आणि मुक्तांगणचे संचालक डॉ. अनिल अवचट यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

नानाला पाहताच मुलांनी जल्लोष सुरू केला. तो जोष टिकवून ठेवत नानाने त्यांच्याशी संवाद साधला. माझ्या बालपणी होती तशी संस्कृती आता राहिली नाही. स्पष्ट बोलतो म्हणून माफ करा. पण, सध्या खूपशा शाळांचा चक्क व्यवसाय झाला आहे. शिक्षक आणि पोलिस हे समाजातील महत्त्वाचे घटक आहेत. एक रक्षण करणारा तर, दुसरा पिढी घडविणारा. पण, या दोघांचेच पगार सर्वांत कमी आहेत.

समाजामध्ये विसंगती इतकी वाढली आहे की, या गोष्टी घडतच राहणार. आई-बाप सकाळपासून रात्रीपर्यंत पैसे कमावण्याच्या इतके मागे लागले आहेत की मुलांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. अचानक एखाद्या दिवशी मुलाला व्यसन लागल्याचे समजते. मग पस्तावण्यात काहीच अर्थ नाही. आई-वडील आपल्या सुखासाठी राबत आहेत याची जाणीव आपल्याला हवी. व्यसनाच्या आहारी जाण्यापेक्षा जगण्यासाठी झिंग असू द्यावी. मलादेखील पोखरून जायला वेळ लागला नसता. मला झिंग आहे ती व्यायामाची. रोज दोन तास व्यायाम करतो. त्याचा मला लाभच होत आहे, असेही नानाने सांगितले.

डॉ. बाबा आमटे यांच्यासारखा माणसातील देव मला भेटला. त्यामुळे गाभार्‍यामध्ये जाण्याची गरज भासली नाही. बाबांना झिंग होती कुष्ठरुग्णांचे आयुष्य सुधारण्याची. गांधीजींना झिंग होती स्वराज्य मिळवून देण्याची. तशी झिंग आपल्यालाही असली पाहिजे. आता व्यसन हे केवळ गरीब आणि झोपडपट्टीपुरते मर्यादित राहिलेले नाही. तर, ते उच्चभ्रूमध्येदेखील आहे. आयुष्य तुमचे आहे. त्याला काय वळण लावायचे ते तुम्हीच ठरवा. कमावण्यासाठी जगू नका. कुणाला तरी काही द्यायचे असे समजून कमवा तरच जगाल. चांगल्या मित्रांचा गोतावळा जमवा. म्हणजे व्यसने तुमच्या जवळ येणार नाहीत, असा वडिलकीच्या नात्याने नानाने सल्ला दिला.

डॉ. अनिल अवचट गेली २५ वर्षे व्यसनात गुरफटलेल्या मुलांना त्यातून बाहेर काढण्याचे काम करीत आहेत. ते म्हणाले, `मुलांचे लाड जरूर करावेत. पण, प्रसंगी त्यांना शिस्तदेखील लावली पाहिजे. सध्याच्या काळात एकीकडे मुलांना भीती राहिली नाही. तर, दुसरीकडे त्यांच्याकडे लक्ष द्यायला पालकांकडे वेळ नाही. त्यामुळे स्वैराचार वाढला असून मुले व्यसनांकडे वळत आहेत.’

गुलाबराव पोळ यांनी अध्यक्षीय समारोप केला. डॉ. मुक्ता पुणतांबेकर यांनी आभार मानले. विक्रम देव यांनी सूत्रसंचालन केले.