मुंबई, दि. ११ – ऑनलाइन ट्रॅव्हल बुकिंगचा वाढता कल तसेच विमा आणि म्युच्युअल फंड या क्षेत्रातील विकसित होणारे नव्या व्यावसायिक पद्धती या पार्श्वभूमीवर यंदा ई-कॉमर्सच्या व्यवसायामध्ये ५० टक्क्यांहून अधिक वाढ होण्याचा अंदाज एका सर्वेक्षणामध्ये वर्तवण्यात आला आहे.
गेल्या वर्षी या व्यवसायातून ४६,५२० कोटींची उलाढाल झाली होती. २००७ मध्ये अवघा ८,१४७ कोटींचा असलेल्या या व्यवसायाने गेल्या तीन-चार वर्षामध्ये घेतलेली ही झेप थक्क करणारी आहे. चालू वर्षामध्येही या व्यवसायाची कामगिरी भारदस्त अशीच राहणार असून, या व्यवसायाचा विकास तब्बल ५० टक्क्यांनी भरारी घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या विकासामध्ये ऑनलाइन ट्रॅव्हल बुकिंगचे मोठे योगदान राहणार असल्याचे सर्वेक्षण संस्था फर्स्ट डेटा कॉर्पोरेशनचे उपाध्यक्ष आणि देशातील व्यवस्थापक अमरीश राऊ यांनी म्हटले आहे.
गेल्या वर्षी रेल्वे आणि विमान तिकिटांच्या बुकिंगचा हिस्सा ८१ टक्क्यांच्या आसपास होता. ट्रॅव्हल बुकिंगने ३७,८९० कोटींचा व्यवसाय केल्याचे राऊ यांनी नमूद केले. त्याचवेळी म्युच्युअल फंड आणि विमा क्षेत्रामध्येही ई-पेमेंट करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. सार्वजनिक क्षेत्राचा काही भाग वगळता सरकारी संस्थासुद्धा या प्रकारच्या पेमेंटचा अधिकाधिक आधार घेऊ लागल्या असल्याचे फर्स्ट डाटाने म्हटले आहे. गेल्या वर्षी ऑनलाइन ट्रॅव्हल बुकिंगमध्ये २०१०च्या तुलनेत ३९ टक्क्यांची वाढ झाली, तर रेल्वे बुकिंगमध्ये ११ टक्क्यांची वाढ नोंदवली गेल्याची आकडेवारी फर्स्ट डाटाने आपल्या अहवालात दिली आहे.
चालू वर्षात पहिल्या तीन महिन्यांचा विचार करता यामध्ये अनुक्रमे ३१ टक्के आणि २८ टक्क्यांची वाढ झाली असल्याचे राऊ यांनी सांगितले. दरम्यान, ई-टेलिंग, डिजिटल डाउनलोड, ऑनलाइन सबस्क्रिप्शन यामध्ये ई-टेलिंगमध्ये ३१ टक्क्यांची वाढ झाली असून, २,७०० कोटींचा महसूल मिळवला आहे. ई-टेलिंगची घोडदौड पुढच्या तीन वर्षातही याच वेगाने होत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.