युवराज आत्मचरित्र लिहिणार

नवी दिल्ली, दि. ११  –  कँसरसारख्या दुर्धर आजारातून बरा होऊन टीम इंडियासाठी खेळण्यात सज्ज झालेला युवराज सिंह आत्मचरित्र लिहिणार आहे. युवराज आपला कँसरसोबतचा लढा `इन डिफरन्ट फॉर्म’ या आत्मचरित्रातून मांडणार आहे.

युवराजला क्रिकेटची कारकीर्द ऐन भरात असताना कँसर झाल्याचे निष्पन्न झाले अन् तमाम क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला होता. भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा हा सळाळत्या रक्ताचा खेळाडू अचानक मैदानातून गायब झाला होता. कँसरचे निदान झाल्यानंतर युवीने थेट अमेरिका गाठून उपचार करून घेतले. यातून तो सहीसलाम बाहेर आला. आता तर तो टीम इंडियासाठी खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे. या पार्श्वभूमीवर युवीचा कँसरशी लढा इतर कँसर रुग्णांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

युवी म्हणतो, `वर्ल्ड कप ते कँसर, या दोन वर्षाच्या काळादरम्यान माझं आयुष्यच पार बदलून गेले. माझ्या भूतकाळातील चुकांपासून शिकत मी टीममध्ये कनिष्ठ सहकार्‍यांना सल्ला देऊन त्यांचा प्रेरित करायचो. कँसर झाल्यानंतर भारतात एकूण कँसर रुग्णांच्या संख्येची मी माहिती घेतली. मी भारतातल्या कँसर रुग्णांच्या एका मोठ्या समूहात सामिल झालो होतो. कँसर रुग्ण कसे एकटे, गोंधळलेले आणि भयग्रस्त होऊन जातात याची मी कल्पना करू शकतो. त्यामुळे माझे चढ उतार मी सांगू इच्छितो. मित्रांनो, आपण सगळे एका टीमचा भाग आहोत. विशेष म्हणजे ज्या संस्थेने लान्स आर्मस्ट्रॉंगचे पुस्तक प्रकाशित केले. तेच माझेही पुस्तक प्रकाशित करत असल्याने मला अत्यानंद होतोय.’

नवी दिल्ली स्थित `रँडम हाऊस’ या प्रकाशन संस्थेतर्फे `इन डिफरन्ट फॉर्म’ प्रकाशित केले जाणार आहे. १२ डिसेंबर २०१२ रोजी हे पुस्तक बाजारात येणार असल्याचे रॅडम हाऊसने जाहीर केले आहे.

Leave a Comment