उपराष्ट्रपती पुन्हा हमीद अन्सारीच?

नवी दिल्ली, दि. १०  – संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) सरकारने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत हमीद अन्सारी यांना उमेदवारी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. यामुळे सध्याचे उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांचीच पुन्हा यापदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक सात ऑगस्ट रोजी होणार आहे.

उपराष्ट्रपतीपदासाठी हमीद अन्सारी यांना युपीएचा पाठिंबा असल्याची माहिती कॉंग्रेसमधील वरीष्ठ नेत्यांनी दिली. यासंदर्भात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शनिवारी जनता दल (सेक्यूलर)चे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून अन्सारी यांना पाठिंबा देण्याची मागणी केल्याचे माहिती पक्षाचे प्रवक्ते दिनेश अली यांनी दिली. अन्सारी यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी डाव्या पक्षांच्या नेत्यांनाही पंतप्रधान करणार असल्याचे समजते.

हमीद अन्सारी यांच्या उमेदवारीला आपण पाठिंबा दर्शवल्याचे देवेगौडा यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नमूद केले आहे. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षानेही यूपीएच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने अन्सारी यांचा विजय निश्चित मानली जात आहे.

यूपीएकडून राष्ट्रपती पदासाठी प्रणव मुखर्जी यांना उमेदवारी मिळण्यापूर्वी हमीद अन्सारी यांचे नाव चर्चेत होते. मात्र, मुखर्जी यांना उमेदवारी दिल्याने आता अन्सारी हे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएने अद्याप उपराष्ट्रपती पदासाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. मात्र, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह आणि पंजाबचे मुख्यमंत्री आणि अकाली दलाचे अध्यक्ष प्रकाश सिंह बादल यांच्या नावांवर भाजपतर्फे विचार सुरू असल्याचे समजते.