एअर इंडियाच्या विमानाचे पाकिस्तानात इमर्जन्सी लँडींग

नवी दिल्ली दि.९- आबुधाबीहून दिल्लीकडे येत असलेल्या एअर इंडियाच्या विमानात दोष निर्माण झाल्याने सोमवारी पहाटे हे विमान पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील नवाबशाह विमानतळावर उतरविण्यात आले असून विमानातील १२२ प्रवासी आणि ६ जणांचा क्रू स्टाफ सुखरूप असल्याचे कळविण्यात आले आहे. हे विमान दिल्ली विमानतळावर पहाटे सव्वापाच वाजता पोहोचणार होते पण अचानक विमानाची हैड्रालिक वॉर्निंग बेल वाजू लागल्याने पुढील धोका टाळण्यासाठी ते नबाबशाह विमानतळावर उतरविले गेले.

विमानातील प्रवाशांना परत आणण्यासाठी दुसरे विमान रवाना करण्यात आले असून याच विमानातून तंत्रज्ञांचे एक पथकही पाठविण्यात आले आहे. हे तंत्रज्ञ विमानात नक्की कोणता दोष निर्माण झाला याची पाहणी करणार आहेत. विमानातील प्रवाशांना दुपारपर्यंत दिल्लीत आणण्यात येत असल्याचे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले. आबुधाबी-नवीदिल्ली ए-९४० ही फ्लाईट बहारीन येथून निघाली होती असे सांगण्यात आले.