ओसामाच्या वास्तव्याची मुशर्रफना होती खबर

सिडने दि.९- निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकारी ब्रिगेडीअर  इजाझ शाह यांनी सिडने मॉर्निंग या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ओसाबा बिन लादेनला पाकिस्तानातील अबोटाबाद येथे अनेक वर्षे थारा देण्यात आला होता आणि त्यासाठी माजी आयएसआय प्रमुख जनरल झईउद्दीन बट यांचाच हात होता असा दावा करण्यात आला असून ओसामाच्या या निवासाची कल्पना पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनाही होती असाही दावा करण्यात आला आहे.

ब्रिगेडिअर शाह याच्या म्हणण्याप्रमाणे पाकिस्तान लष्करातील अन्य विभाग आणि अमेरिका ओसामाचा शोध घेत होते तेव्हाच आयएसआय प्रमुख बट यांनी ओसामाला अबोटाबाद येथे आसरा उपलब्ध करून दिला होता. इतकेच नव्हे तर अबोटाबाद येथील ओसामाच्या घराभोवतीची उंच भितही बट यांच्याच आदेशाने बांधून देण्यात आली होती. बट अतिशय महत्त्वाचे आणि पॉवरफुल अधिकारी होतेच पण मुशर्रफ यांच्या खास मर्जीतले होते. बट यांनी मुशर्रफ यांना पूर्ण कल्पना देऊनच ओसामाची सोय लावून दिली होती असेही शाह यांचे म्हणणे आहे.