मिनी स्कर्ट नकोत – काश्मिरी धार्मिक गटाचा फतवा

श्रीनगर दि.५ – जमात-ए-इस्लाम या काश्मीरमधील एका धार्मिक गटाने  काश्मीर खोर्‍याला भेट देण्यासाठी येताना पर्यटकांनी मिनी स्कर्टसारखे तोकडे कपडे घालू नयेत, असे सांगताना पर्यटन विभागालाही याबाबत सक्ती करण्यास सांगितले आहे. काश्मीर खोर्‍यात तोकडे कपडे घालू नयेत . अन्यथा लोकांच्या संतापाचा सामना करावा लागेल, असा इशारा या गटाने दिला आहे.

काही पर्यटक, प्रामुख्याने परदेशी लोक शॉर्ट मिनी स्कर्ट आणि अन्य काही आक्षेपार्ह कपडे घालून खुलेपणाने फिरत असतात. त्यांची वेशभूषा स्थानिक लोकभावना आणि संस्कृतीविरुद्ध असते. येथील नागरिक हे स्वीकारू शकत नाहीत, असे जमात-ए-इस्लाम या राजकीय-धार्मिक संस्थेने एका निवेदनाद्वारे म्हटले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून काश्मीर खोर्‍याला भेट देणार्‍या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी सुमारे १५ लाख पर्यटकांनी येथे हजेरी लावली होती आणि या वर्षी आतापर्यंत पाच लाखांपेक्षा अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे.
 
पर्यटकांना स्थानिक लोकभावनेचा आदर करण्याच्या सूचना देण्याची जबाबदारी पर्यटन विभागाची आहे. यामध्ये त्यांना अपयश आले, तर लोकांच्या संतापाला सामोरे जावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.