
पुणे, दि. २ – ज्येष्ठ विचारवंत, पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. रामचंद्र महादेव ऊर्फ राम बापट यांचे सोमवारी सकाळी पुण्यात निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते.

पुणे, दि. २ – ज्येष्ठ विचारवंत, पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. रामचंद्र महादेव ऊर्फ राम बापट यांचे सोमवारी सकाळी पुण्यात निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते.
महाराष्ट्रातील विविध परिवर्तनवादी सामाजिक संस्था तसेच चळवळींचे मार्गदर्शक असलेले प्रा. बापट यांनी नाशिक येथे झालेल्या चौथ्या विचारवेध संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. प्रा. बापट यांच्यावर दुपारी दीड वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
प्रा. बापट यांचा अल्पपरिचय
प्रा. बापट यांचे महाविद्यालयीन शिक्षण एस. पी. कॉलेज, पुणे येथे झाले. नंतर ते पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. त्या विभागात दीर्घ काळ अध्यापन कार्य केल्यानंतर प्रा. बापट १८ नोव्हेंबर १९९१ रोजी विद्यापीठाच्या सेवेतून निवृत्त झाले होते. यांनी या काळात वेगवेगळ्या विषयांचा मोठा व्यासंग केला. अनेक विषयांत त्यांनी प्राविण्य मिळवले होते. साहित्य, नाट्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र या विषयांचा तर त्यांनी अभ्यास केलाच शिवाय नाटकांवरील अनेक शिबिरात त्यांनी व्याख्याने दिली.
प्रा. बापट यांच्या विचारांवर लोकशाही समाजवादी विचारांचा प्रभाव होता. समाज प्रबोधन संस्था, आंबेडकर अकादमी किंवा युक्रांद सारख्या संस्थांच्या शिबिरांना हजर राहून अनेक विषयांवर ते विचार मांडत असत. असामान्य अशा विचारशक्तीबद्दल सर्व देशभरात त्यांचा लौकिक होता. त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडवल्या. अनेकांना नवा विचार करण्याची प्रेरणा दिली. वैचारिक क्षेत्रात नवनव्या विषयांचा परिचय त्यांनी लोकांना करून दिला.
लोकवाडगृह तीन खंडात प्रा. बापट यांचे लिखाण छापत असून विविध लेखकांच्या पुस्तकांना लिहिलेल्या सहा दीर्घ प्रस्तावनांचा संग्रह `परामर्श’ या नावाने अलीकडेच प्रकाशित झाला आहे.