सेनाप्रमुखांनी आदेश दिला तर उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवू

अंबेजोगाई दि.३०- शिवसेनेचे वरीष्ठ नेते आणि माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश दिला तर आपण उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे वक्तव्य केले आहे. अंबेजोगाई येथे कुलदेवी योगेश्वरीच्या दर्शनासाठी सहकुटुंब आलेल्या जोशी यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यात हे वक्तव्य केले आहे. अर्थात बाळासाहेबांचा कोणताही आदेश शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून पाळणे हे आपले कर्तव्यच असल्याचे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्यासही मनोहर जोशी उत्सुक होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना ते त्यासंबंधात भेटलेही होते. मात्र त्यावर कोणतीही प्रतिक्रीया बाळासाहेबांनी दिली नव्हती. आता राष्ट्रपतीपदासाठी सेनेने प्रणवदांना पाठिबा दिला आहे. मात्र उपराष्ट*पतीपदाची निवडणूक अजून बाकी आहे आणि जोशीसाहेबांना ती निवणडूक लढविर्‍याची इच्छा ही आहे कारण मागेच एका मुलाखतीत त्यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्याची इच्छा असू शकते व त्यात कांही गैर नसल्याचा खुलासा केला होता.

अंबेजोगाई येथे नुकत्याच झालेल्या चोरीत देवीचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. या चोरीविषयी बोलताना दरोड्याची घटना निंदनीय असल्याचे सांगून ते म्हणाले की देवीचे दागिने परत बनविण्यासाठी भाविकांनाच देणगी देण्यासाठी साकडे घालावे अशी आपली इच्छा आहे .