पुणे शहरात कलम ३७ लागू

पुणे, दि. ३० – पुणे शहरात विविध पक्ष व संघटनाकडून विविध मागण्यांसाठी रास्ता रोको, रॅली, निषेध, मोर्चे तसेच दि. ६ जुलै २०१२ रोजी `शब्बे बारात’ असल्याने पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने दि. १ ते १४ जुलै २०१२ पर्यंत मुंबई पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७ (१ व ३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे, असे संजीवकुमार सिंघल पोलीस सह आयुक्त, पुणे शहर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

यानुसार शस्त्रे, सोटे, भाले, स्फोटक पदार्थ बरोबर नेणे अथवा बाळगणे, सभ्यता अगर नितिमत्ता राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल असे वर्तन करण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच मोठ्याने घोषणा देणे, मिरवणूक काढणे, भाषण करणे, अविर्भाव करणे, सभा घेणे, पाच किंवा पाचपेक्षा अधिक इसमांचा जमाव करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. आदेशाचे उल्लंघंन करणारी व्यक्ती कायद्यानुसार शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात नमूद केले आहे.

Leave a Comment