विम्बल्डनमधून नदाल बाहेर

विम्बल्डनमध्ये आज झालेल्या एका सामन्यात धक्कादायक निकाल लागला असून स्पेनच्या राफाल नदालला या सामन्यात आश्चर्यकारकरित्या पराभव स्वीकारावा लागला आहे. चुरशीच्या लढतीत त्याचा लुकास रोसोलने ६-७, ६-४, ६-४, २-६, ६-४ असा पराभव केला आहे. विम्बल्डनमध्ये  दुसऱ्या फेरीमधूनच नादालला पराभवाचा सामना कराव लागल्याने त्याचे जेतेपदाचे स्वप्न मात्र भंगले आहे. 

काही दिवसापूर्वीच त्याने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते. त्यामुळे या स्पर्धेत तो विजेतेपद मिळवेल असे सर्वानाच वाटत होते. मात्र या दुसऱ्या फेरीतील सामन्यातच रोसोलने सर्वोत्कृष्ट खेळीचे प्रदर्शन करीत ग्राउन्ड शॉट मारून नदालला चांगलेच हैराण केले होते. हा सामना बराच वेळ चालल्याने उत्सुकता शेवटपर्यंत शिगेला पोहचली होती. गेल्या सात वर्षात पहिल्यांदाच नदालला दुसऱ्या फेरीतच पराभव पत्करावा लागला आहे. त्याच्या या प्रदर्शनामुळे जगभरातील त्याचे चाहते मात्र नाराज झाले आहेत.