शिवसेनेची नाराजी – प्रणवदा बाळासाहेबांना भेटणार

मुंबई दि.२९ – यूपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून प्रणव मुखर्जींना काल अर्ज दाखल केला खरा पण कळत नकळत त्यामुळे त्यांनी निराळेच संकट ओढवून घेतले असल्याची चर्चा राजधानीत सुरू झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अर्ज भरताना बहुतेक सर्व पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आले पण आपल्या साथीदारांविरोधात जाऊन प्रणवदांना पाठींबा देणार्‍या शिवसेनेला मात्र दुर्लक्षिले गेले. अर्ज भरताना काल शिवसेनेचा एकही नेता प्रणवदांच्या सोबत नव्हता आणि त्यामुळेच आता शिवसेना नाराज झाली असणार या भीतीने काँग्रेसला धडकी भरली आहे.

अर्थात काँग्रेसला वेळीच शहाणपण सुचले असून ही नाराजी दूर करण्यासाठी प्रणवदा स्वतःच मुंबईत येऊन बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहेत असे सांगण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर पंतप्रधान मनमोहनसिंग हेही बाळासाहेबांशी फोनवरून संपर्क साधणार आहेत असेही समजते. शिवसेनेच्या नेत्यांना आमंत्रण मुद्दामच देण्यात आले नाही का अनवधानाने राहून गेले याचा खुलासा मात्र करण्यात आलेला नाही.

शिवसेनेने एनडीएच्या विरोधात जाऊन तसेच त्यांचा निवडणुकीतला मित्रपक्ष असलेल्या भाजपच्याही विरोधात जाऊन सर्वप्रथम प्रणव मुखर्जींना आपला पाठींबा जाहीर केला होता. त्यात भाजपची नाराजी ओढवून घेण्याचा धोकाही शिवसेनेने पत्करला. मात्र शिवसेनेच्या मतांची दखलच काँग्रेसकडून घेण्यात आली नाही आणि त्यातूनच शिवसेनेकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार घडला असावा असे मत जाणकार व्यक्त करत आहेत. शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी मात्र आम्ही कोणतीही अपेक्षा न ठेवताच प्रणवदांना पाठींबा दिला आहे असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र शिवसेनेची नाराजी भारी पडू शकते असा सल्ला काँग्रेसला जाणकारांनी दिल्यानंतर आता नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

Leave a Comment