सुनीता विल्यम्स भारतीय मुलगी दत्तक घेणार

अहमदाबाद, दि. २८ – भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स लवकरच अहमदाबादमधील मुलगी दत्तक घेणार असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली आहे. एका अमेरिकास्थित संस्थेच्या माध्यमातून ही मुलगी दत्तक घेण्यात येणार असून, सुनीताची बहिण दीना यांनी दत्तकविधानासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रियेस सुरुवात केली आहे.

विल्यम्सने २००७ मध्ये दिलेल्या गुजरात भेटीवेळी भारतात होत असलेल्या स्त्री भूणहत्येबाबत चिंता व्यक्त केली होती. `मर्यादा या केवळ आपल्या मनात असतात. त्यामुळे लिंगभेदावर आधारित सामाजिक बंधनांना तुम्ही विरोध करायला हवा,’ असे मत तिने कडी येथे एका संमेलनामध्ये मांडले होते. लवकरच नव्या अवकाश मोहिमेवर निघालेली विल्यम्स मोहिमेनंतर भारतात येणार आहे. सुनीता कझाकस्तान येथील बैकानूर कॉस्मोड्रोममधून १४ जुलै रोजी आपल्या दुसर्‍या अवकाश मोहिमेस सुरुवात करणार आहेत.
मोहिमेहून परतल्यानंतर ती दत्तकविधानाची औपचारिकता पूर्ण करणार असल्याची माहिती तिचे अहमदाबादमधील बंधू दिनेश रावल यांनी दिली. गुजरातमध्ये स्त्री-पुरुषांच्या जन्मदरामध्ये असलेल्या तफावतीबाबत सुनीतासोबत नेहमीच चर्चा होत असल्याचे सुनीताचे वडील दीपक पंड्या यांनी सांगितले. तथापि, मुलगी दत्तक घेण्याचा निर्णय हा सर्वथा सुनीता आणि पतीचा असल्याचे पंड्या म्हणाले.