अगाथा संगमांची हकालपट्टी करण्याची मागणी

नवी दिल्ली दि.२७- पक्षाध्यक्षांचा आदेश झुगारून वडिलांचा प्रचार करणार्‍या अगाथा संगमा यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युथ विंगने पक्षाध्यक्षांकडे आग्रह धरला असून अगाथा विरोधाची मोहिम अधिक तीव्र केली आहे. दरम्यान अगाथा यांना मंत्री पदाचा राजीनामा देण्याचा आदेश आज बुधवारी दिला गेला आहे.

याविषयीची हकीकत अशी की राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरलेले पी.ए.संगमा यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. मात्र त्यांची कन्या अगाथा ही राष्ट्रवादीची खासदार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अगाथाला संगमा हे भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवित आहेत आणि राष्ट्रवादीने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर राहून प्रणव मुखर्जींना पाठिंबा दिला असल्याने तिने वडिलांच्या प्रचारात उतरू नये अशी सूचना दिली होती. मात्र अगाथाने वडिलांचा प्रचार सुरू केला आहे. राष्ट्रवादीचे युवा विंगचे असे म्हणणे आहे की आमचाच खासदार विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करतो आहे हे आमच्यासाठी फारच अडचणीचे ठरते आहे त्यामुळे अगाथाची पक्षातून हकालपटटी करावी व तिला पक्षातून निलंबित करावे अशी आमची मागणी आहे व त्यासाठी आम्ही आग्रही आहोत.

या मागणीला अधिक बळ येण्यासाठी राष्ट्रवादी यूथ विंगच्या सर्व राज्यांतील अध्यक्षांनी तसे पत्र पक्ष नेतृत्त्वाला पाठवावे असाही आदेश देण्यात आला असल्याचे समजते.

Leave a Comment