पुणे-नाशिक रेल्वे मार्गास मान्यता काही भाग खाजगीकरणातून

पुणे, दि. २७ – पुणे-नाशिक या प्रस्तावित रेल्वेमार्गांच्या कामाला गती मिळण्याचे संकेत असून राज्य सरकारने या दोन्ही मार्गांसाठीचा निम्मा खर्च उचलण्याचे मान्य केले आहे. तसे पत्र राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाकडे पाठवले असून, या दोन्ही मार्गांचा प्राधान्याने विचार करावा अशी विनंतीही करण्यात आली आहे. मात्र रेल्वेकडे आर्थिक निधीची कमतरता असल्याने चालू वर्षात सर्व्हेक्षण होण्याची शक्यता कमीच आहे,  अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

दीर्घकाळ प्रलंबित असेलल्या पुणे – नाशिक रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारने आपल्यातर्फे १४९.८२ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. रेल्वेमार्गासाठी एकूण १८९९.६४ कोटी रुपये खर्च येणार असून राज्य आणि रेल्वे मंत्रालय या दोघांच्या निधीतून तो साकारला जाणार आहे.

एकूण २६५ किलोमीटर लांबीच्या मार्गातील नाशिक ते गुळवंच (सिन्नर) हा २६ कि.मी.चा टप्पा खासगीकरणातून तयार होत आहे. तर, देहूरोड ते पुणे हा ३० किमीचा मार्ग सध्या अस्तित्वात आहे.

सध्या मनमाड-नाशिक-पुणे रेल्वेमार्ग कार्यान्वयित असला तरी नाशिक ते पुणे हा प्रवास साधारण सात तासांचा आहे. औद्योगिक विकास, शैक्षणिक केंद्र, ऑटोमोबाईल उद्योग, आयटी कंपन्या आणि सांस्कृतिक घडामोडींमुळे पुणे हे राज्यातील महत्त्वाचे शहर आहे. तर औद्योगिकदृष्ट्या होणारा विकास, विकसित कृषी क्षेत्र, वायनरी आदिंमुळे नाशिकही महत्त्वाचे शहर बनले आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गांना जोडणारा रेल्वेमार्ग विकसीत करण्यात येत आहे.

कराड-चिपळूण या ११५.० किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाने पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकण हे दोन प्रांत जोडले जाणार असल्याने तोही तितकाच महत्त्वाचा आहे. या रेल्वे मार्गासाठी एकूण ९२८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून यातील ४६४.०५ कोटी रुपये राज्य सरकार खर्च करणार आहे. दरम्यान, रेल्वे विभागाकडे निधीची कमतरता असल्याने या दोन्ही मार्गांसाठी आवश्यक निधीची उपलब्धता कशी करावी, असा प्रश्‍न सध्या असल्याचे त्यांनी सांगितले.