वाहन उत्पादकांच्या स्लो डाऊनमुळे लघुउद्योजक अडचणीत

पुणे दि.२७- देशाचे डेट्रोईट अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिचवड परिसरातील अनेक बड्या वाहन उत्पादक कंपन्यांनी त्यांचे प्रकल्प आठवड्यातून कांही दिवस बंद ठेवून उत्पादन कमी करण्याचा मार्ग अनुसरल्याने या कंपन्यांना सुटे भाग पुरविणारे अनेक लघुउद्योजक अडचणीत सापडले आहेत. टाटा मोटर्स,व्होक्स वॅगन, जनरल मोटर्स, अशा अनेक वाहन उत्पादक कंपन्या बाजारात मालाला उठाव नसल्याने आपले उत्पादन कमी करत आहेत. त्यासाठी आठवड्यातले एक ते तीन दिवस प्रकल्प बंदच ठेवण्यात येत आहेत. टाटा मोटर्सनेही या आठवड्यात २२ ते २४ जूनपर्यंत त्यांचे उत्पादन थांबविले होते.
 
टाटा मोटर्सला सुटे भाग पुरविणारे ऑटोलाईन इंडस्ट्रीचे मालक शिवाजी आखाडे याविषयी बोलताना म्हणाले की कंपनीच्या या निर्णयामुळे आम्हीही आमचे उत्पादन २० टक्कयांनी कमी केले आहे. कंत्राटी कामगारांना कमी करण्याशिवाय आमच्याकडेही सध्या दुसरा पर्याय नाही. कामगारांच्या पाळ्यांचे तासही कमी करावे लागले आहेत. जादा कर्मचार्‍यांना प्रशिक्षणासाठी पाठविले गेले आहे. सुटे भाग तयार करणार्‍या अनेक कंपन्या आहेत. त्यामुळे मालाची कमतरता नाहीच. आम्हालाही मालाच्या किमती वाढविता येत नाहीत. २००८ सालात अशीच परिस्थिती उद्भवली होती पण ती चार महिन्यात सुधारली. आत्ताची परिस्थिती कधी सुधारेल हे मात्र सांगता येत नाही.

जनरल मोटर्सचे  उपाध्यक्ष पी.बालेंद्रन म्हणाले की सध्या स्लो डाऊन आहे हे खरे. पण सुदैवाने भारतीय अर्थव्यवस्था यातूनही तगून निघेल अशी आशा आहे. व्याजदर कपात, आर्थिक सुधारणा तातडीने केल्या जायला हव्यात. महागाई, इंधन दरवाढ आणि टंचाई याने नागरिक अगोदरच पिचले आहेत. त्यात ८५टक्के  वाहन विक्री अर्थपुरवठ्यावरच अवलंबून असते. उत्पादन विभागात मंदी आली तर त्याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत असतो त्यामुळे तातडीने आर्थिक सुधारणा करणे गरजेचे आहे.

Leave a Comment