अबू हमजाचा आमदार निवासात मुक्काम?

मुंबई दि. २६ – दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमातळावर पकडण्यात आलेला २६-११ मुंबईतील हल्ल्यातील कुख्यात दहशतवादी सैय्यद जबीउद्दीन अबू जिंदाल तथा अबू हामजा हा महाराष्ट्र सरकारमधील आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांच्या निवासस्थानी राहीला होता, अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, आपल्याला याप्रकरणी गृहमंत्रालयाने क्लिन चीट दिल्याचे फौजिया खान यांनी म्हटले आहे. मात्र, मी कोणत्याही चौकशीस सामोरे जाईन, अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे.

मुंबईवरच्या २६-११ च्या हल्ल्यातला आरोपी अबू हमजाच्या चौकशीसाठी मुंबई क्राईम ब्रांच आणि एटीएसची टीम दिल्लीला जाणार आहे. सैय्यद जबीउद्दीन अबू जिंदाल हा आमदार निवासातील फौजिया खान यांच्या रूममध्ये राहिल्याचे चौकशीत पुढे आले आहे. परिणामी हामजा याच्या अटकेनंतर फौजिया खान अडचणीत आल्या आहेत. फौजिया खान यांनी आपण अबू हामजा अशा व्यक्तीला ओळखत नाही. आमदार निवासात राहण्यास खूप लोक येत असतात. त्यामुळे प्रत्येकाला ओळखणे कठीण असते असे सांगितले आहे.