अबू हमजाचा निशाना नरेंद्र मोदी?

नवी दिल्ली दि. २६ – मुंबईवरील २६-११च्या भयंकर दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी आणि इंडियन मुजाहिदीनचा अतिरेकी सय्यद जबीउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू हमजा याला दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने ५ जुलैपर्यंत त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. त्याचे कुटुंबिय बेपत्ता असून गेवराई येथील त्याच्या निवासस्थानी कुलुप आहे. पोलिसांची त्याच्या घरावर पाळत आहे. घराला कुलुप ठोकून त्याचे नातेवाईक पळून गेले, असे पोलिसांनी सांगितले. अबू हमजाचा ताबा घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मुंबई पोलिसांचे एक पथक त्यासाठी नवी दिल्लीलाही जाणार आहे.

अबू जुंदल भारतात कशासाठी परतला, हे एक मोठे कोडे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी त्याच्या निशाण्यावर होते. दिल्ली पोलिसांनी त्याला काही दिवसांपूर्वीच अटक केली होती. परंतु, डीएनए चाचणीनंतर त्याची ओळख पटल्यानंतरच अटकेची माहिती देण्यात आली. गोध्रा दंगलीनंतर तो अतिशय व्यथित झाला होता. त्यामुळेच त्याने मोदी यांच्या हत्येचा कट रचला होता असे समजते.

दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात पोलिसांनी त्याला हजर केले. अबू सौदीत रियासत अली नावाने राहत होता.

Leave a Comment