नवी दिल्ली, दि. २६ – दिल्ली पोलिसांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडलेल्या मुंबई बॉम्बस्फोटाशी संबंधित अबू हामजा या अतिरेक्याचा मुक्काम सौदीत होता आणि तो तिथे या वर्षातच करावयाच्या आणखी एका मोठ्या हल्ल्यासाठी पैसा गोळा करत होता असे पोलिसांना चौकशीत समजले आहे. अबूला अटक होताच पाकिस्तानने लगोलग गुन्हेगार हस्तांतरणाबाबत पुन्हा नव्याने बोलणी करण्याची तयारी दर्शविल्यानेही शंकेचे वातावरण निर्माण झाले असून, अबूच्या चौकशीत पाकिस्तानच्या आयएसआयचा मुंबई हल्ल्यात असलेला सहभाग उघड होण्याच्या भीतीनेच पाकिस्तान सरकारने हे पाऊल उचलले असल्याचेही बोलले जात आहे.
पुढील हल्ल्यासाठी अबू सौदीत गोळा करत होता फंड
अबू हामजा हा भारतात अनेक गुन्ह्यात हवा असलेला आरोपी आहे आणि तरीही त्याने भारतात येण्याचा धोका का पत्करला तसेच इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस त्याच्याबाबत बजावली गेली असतानाही तो इतका उघड विमानात चढलाच कसा, याचाही तपास पोलिस करत आहेत. सौदीतून त्याची हकालपट्टी करण्यात आली असावी असा कयास पोलिस व्यक्त करत आहेत. गेली तीन वर्षे अबू पाकिस्तानी पासपोर्टवर सौदीत आहे. मात्र भारतीय गुप्तवार्ता विभागाने अबूची ओळख डीएनएवरून पटवून सौदी सरकारला तो भारतीय नागरिक असल्याचे पटवून दिले आहे तसेच तो अनेक गुन्ह्यात पोलिसांना हवा असल्याचे सांगितले आहे असे सांगण्यात येत असून, त्यामुळेच त्याला सौदीतून हकलण्यात आले असावे असे कांही वरीष्ठ पोलिस अधिकार्यांचे मत आहे. सौदीत त्याच्यावर पाकिस्तानकडून भारतीय नागरिकांना हेरून त्यांना इंडियन मुजाहिद्दीनचे सभासद बनविण्याची जबाबदारीही दिली गेली होती असेही तपासात स्पष्ट झाले आहे.
