पुण्यात राजकीय नेत्यांच्या पाठिंब्यावर अंडरवर्ल्डचे गुंड सक्रिय

पुणे, दि. २६- पुणे आणि आसपासच्या परिसरात जागांच्या किंमतीत झालेली प्रचंड वाढ गेल्या दोन वर्षांपासून गँगस्टर लोकांचे लक्ष वेधून घेण्यास कारणीभूत ठरली असल्याचे पुणे ग्रामीण पोलिस अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. चाकण, तळेगांव, शिरूर, हवेली, मुळशी या भागात वाढत असलेल्या औद्योगिक वसाहतीत छोटा राजन गँगचा उपद्रव वाढत चालला आहे आणि त्याला येथील स्थानिक राजकीय नेत्यांकडून अभय मिळत असल्याचेही या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. अर्थात राजकीय नेते आणि गँगस्टर लागेबांधे असल्याचा ठोस पुरावा अद्यापी पोलिसांच्या हाती आलेला नाही.

पुण्याच्या आसपासच्या परिसरात विशेषत: जिथे सेझ लागू आहे त्या औद्योगिक वसाहतीत तळेगांव, चाकण, शिरूर, हवेली, मुळशी या भागात या गँगच्या कारवाया वाढल्या आहेत असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सांगतात. या भागातील स्थानिक राजकीय पुढारी तसेच सरपंच या गँगचे मेंबर बनत असल्याचेही पोलिसांना आढळून आले आहे. गेले दोन महिने ग्रामीण पोलिस या नेत्यांवर बारीक लक्ष ठेवून आहेत आणि त्यातूनच मुंबईतील अंडरवर्ल्ड गँगचा त्यांना भक्कम पाठिंबा असल्याचे पुरावे त्यांच्या हाती आले आहेत. गेली दोन वर्षे या भागातील १० राजकीय नेते जमीन खरेदी-विक्री व्यवहारात गुंतलेले आहेत आणि त्यांच्या मुंबई आणि लोणावळ्याला होत असलेल्या वारंवारच्या खेपा या संशयाला पुष्टी देणार्‍या असल्याचे वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

वरील भागातील औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योजकांनी गेल्या कांही महिन्यात पुणे ग्रामीण पोलिसांकडे हे राजकीय गुंड धमक्या देत असल्याची तक्रार केल्यावरून या भागात शोध मोहिम हाती घेतली आहे. जमीनी बळकावणे, अन्य परवानग्या मिळविणे यासारखी कामे हे गुंड मुंबईच्या गँगच्या पाठिंब्यावर करत आहेत. राज्य शासनानेही याची दखल घेतली असून तपासाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी २०० लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून हे सर्व पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत असेही या अधिकार्‍यांनी सांगितले.

वरीष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गोकावे यांनी दिलेल्या माहितीनुसार या औद्योगिक पट्ट्यात २००७ पासून दोन खून, सहा खंडणीचे प्रकार, वीस दरोडे, तीस दंगली व अन्य ६ गंभीर गुन्हे घडले आहेत. चाकण, रांजणगांव, तळेगांव येथे घडलेले गुन्हे हे केवळ हिमनगाचे एक टोक असल्याचे त्यांचे म्हणणे असून कित्येक केसेस नोंदविल्याच गेलेल्या नाहीत असेही गोकावे म्हणाले.

Leave a Comment