‘झेंटलमन’साठी नामदेव ढसाळ यांचे गीतलेखन

एम.आर. फिल्म्स प्रस्तुत, राहूल गवारे यांची निर्मिती असलेल्या, असित रेडीज दिग्दर्शित ‘झेंटलमन‘ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच एका गीताच्या ध्वनिमुद्रणाने झाला. गीताचे शब्द होते – ‘मी अलबेली चंचल छोरी, छन छन बाजे पायल मोरी..’ नखरेलपणा ओतप्रोत भरलेले आणि मुज-याच्या अंगाने जाणारे हे गाणे लिहिले आहे सर्वश्रृत कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी.

मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेतल्या शब्दांचा वापर असलेले हे गाणे आहे. नेहा कक्कर हिच्या आवाजात ऐकायला मिळणा-या या गीताला संगीत दिले आहे सतीशचंद्र यांनी. या चित्रपटासाठी गाणे लिहायला सांगितले तेव्हा फिल्मी गाणे लिहिण्याच्या प्रोसेसपासून आपण खूप दूर गेलो होतो, पण निर्माते राहूल गवारे, संगीतकार सतीशचंद्र आणि दिग्दर्शक असित रेडीज यांनी मला विषय आणि सिच्युएशन ऐकवल्यावर या चित्रपटासाठी गाणे लिहिण्याचा मोह झाला, आणि चित्रपटासाठी ब-याच वर्षांनी मी गीत लिहिले असून ते जमलेही छान आहे. याच कारणामुळे तब्येत बरी नसतानाही या रेकॉर्डिंगला आवर्जून हजर राहिलो असे कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी बोलून दाखवले.

आजच्या सामाजिक व्यवस्थेवर नेमके बोट ठेवणारा असा हा चित्रपट आहे. शहरी आणि ग्रामीण पार्श्‍वभूमी लाभलेल्या झेंटलमनचे साठ टक्के चित्रीकरण मुंबईत आणि चाळीसटक्के चित्रीकरण मुंबईच्या बाहेर केले जाणार असून, ऑगस्टपासून सलग याचे चित्रीकरण होणार आहे.  या चित्रपटात एकूण पाच गाणी असून सगळी सिच्युएशनल सॉग्ज आहेत असे संगीतकार सतीशचंद्र म्हणाले. या चित्रपटात संजय नार्वेकर, आनंद अभ्यंकर, उषा नाडकर्णी आणि स्वत: दिग्दर्शक असित रेडीज काम करणार आहेत.