
पुणे – सुप्रसिद्ध निवेदक आणि सूत्रसंचालक असलेले सुधीर गाडगीळ आता अभिनेत्या भूमिकेत म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण करीत आहेत. एका नाटकावर आधारीत बदाम राणी, गुलाम आणि चोर या चित्रपटात ते पत्रकाराची भूमिका साकारणार आहेत.

पुणे – सुप्रसिद्ध निवेदक आणि सूत्रसंचालक असलेले सुधीर गाडगीळ आता अभिनेत्या भूमिकेत म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण करीत आहेत. एका नाटकावर आधारीत बदाम राणी, गुलाम आणि चोर या चित्रपटात ते पत्रकाराची भूमिका साकारणार आहेत.
दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केलेल्या बदाम राणी गुलाम, चोर या चित्रपटात उपेंद्र लिमये (चाकू), आनंद इंगळे (माकड), पुष्कर श्रोत्री (पुस्तक) आणि मुक्ता बर्वे (पेन्सिल) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विवेक बेळे यांच्या `माकडाच्या हाती शॅम्पेन’ या प्रायोगिक रंगभूमीवरील यशस्वी नाटकावर हा चित्रपट बेतलेला आहे. यामध्ये सुधीर गाडगीळ हे पत्रकाराची भूमिका साकारत असून चित्रपटातील राजकीय नेत्याला अडचणीत आणणारी मुलाखत त्यांनी घेतली आहे. ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे हे राजकीय नेत्याच्या भूमिकेमध्ये आहेत. पत्रकारितेपासून कारकिर्दीची सुरुवात करणारे सुधीर गाडगीळ आणि विनय आपटे यांच्यातील ही मुलाखत १५ मिनिटे रंगणार आहे.
अभिनय हा माझा प्रांत नाही; पण दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी प्रेमाने विनंती केली. त्यांना नाही म्हणणे शक्य नव्हते आणि रुपेरी पडद्यावरदेखील पत्रकाराचीच भूमिका साकारायची असल्यामुळे मी यामध्ये सहभागी झालो, असे गाडगीळ म्हणाले. सतीश राजवाडे यांच्याबरोबर काम करण्याचा आणि अभिनयाच्या प्रांतामध्ये सामील होण्याचा अनुभव आनंददायी होता, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. जोशी-अभ्यंकर खून खटल्यावर आधारित मामीचा साक्षीदार आणि विजय कोंडके दिग्दर्शित `माहेरची साडी’ या चित्रपटात सुधीर गाडगीळ यांनी यापूर्वी छोटेखानी भूमिका केल्या आहेत.