जळगाव भाजपच्या वतीने शुक्रवारी जेलभरो आंदोलन

जळगाव, दि. २० – केंद्र शासनाने सर्व बाजूने सामान्यांची केलेली गळचेपी, महागाई, बोकाळलेला भ्रष्टाचार यावर अपयशी ठरलेल्या सरकारला त्याची जागा दाखविण्यासाठी भाजपतर्फे २२ जून रोजी जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे. त्यात सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा भाजपतर्फे करण्यात आले आहे. तसेच या कालावधीत पक्ष सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे.

अशोक कांडलेकर बैठकित मार्गदर्शन करतांना म्हणाले की, २५ जुलै ते १० ऑगस्ट काळात भाजपतर्फे संपुर्ण जिल्हयात सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार असून त्यात तीन लाख सदस्य नोंदविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या संकल्पपूर्तीसाठी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनी पूर्ण वेळ द्यावा असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक गाव, शहर, वस्ती, रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड, महाविद्यालय, बाजार, अल्पसंख्याक व आदिवासी भागात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जाऊन तेथील नागरिकांना पक्षाची ध्येय धोरणे सांगून सदस्य करावे तसेच केंद्र व राज्य सरकारच्या नाकर्तेपणाची नागरिकांना जाणीव करून द्यावी, असे कांडलेकर यांनी सांगितले.

सरकारला जाग आणण्यासाठी तसेच जनतेने आपल्या प्रश्‍नाबाबत जागृत व्हावे यासाठी हे आंदोलन कऱणार असल्याचे भाजपाच्या वतीने सांगण्यात आले.