लॉस काबोस, दि. २० – आर्थिक अरिष्टातून युरोझोन देशांना वाचविण्यासाठी आणि त्याचा विकसनशील देशांवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी राबविण्यात येणार्या उपाययोजनांसाठी भारत सरकारने मंगळवार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला १० अब्ज अमेरिकी डॉलरची मदत देण्याची घोषणा केली.
`जी-२०’ परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मनमोहनसिंग म्हणाले, “युरोझोनला स्थिर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे सर्व सदस्यांनी नाणेनिधीला मदत करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. नाणेनिधीच्या ४३० अब्ज अमेरिकी डॉलरच्या अतिरिक्त फायरवॉलसाठी भारताने १० अब्ज अमेरिकी डॉलर मदत करण्याची निर्णय घेतला आहे. चीनसारख्या देशांनी नाणेनिधीला मदत करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.”
ग्रीसमधील नवनिर्वाचित सरकारचे अभिनंदन करून पंतप्रधान म्हणाले, की कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला देश युरोझोनमध्ये राहील आणि धोरणात्मक निर्णय घेईल, अशी मी आशा करतो. युरोझोनमधील आर्थिक संकटाच्या झळांमुळे भारत आणि चीनसारख्या विकसनशील अर्थव्यवस्थांच्या प्रगतीला खीळ बसली आहे.