संत ज्ञानेश्‍वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे पुण्यात भावपूर्ण स्वागत

‘पंढरीची वारी आहे माझे घरी |
आणिक न करीं तीर्थव्रत |
कैवल्यमूर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे पुणेकरांनी मनोभावे स्वागत केले. पुण्यात जिकडे पहावे तिकडे वारकर्‍यांच्या दिंड्या-पताकाच दिसत असून अवघी पुण्यनगरी माउलीमय झाली आहे. संतश्रेष्ठांच्या दर्शनासाठी पुणेकरांनी अलोट गर्दी केली असून अनेक ठिकाणी वारकर्‍यांना अन्नदान करून नागरिकांनी पुण्य साधले. संत ज्ञानेश्‍वरांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठ इथल्या निवडुंग्या विठोबा मंदिरात तर संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम पालखी विठोबा चौकात राहणार आहे.

‘ज्ञानेश्‍वर माऊलीमच्या गजरात पुण्यनगरीतील भाविकांनी पालख्यांचे स्वागत केले. संतांच्या पादुकांना स्पर्श करण्यासाही अवघा जनसागर लोटल्याचे चित्र होते. पुणे शहराला भक्तीच्या महासागराचेच स्वरुप प्राप्त झाले आहे. अभंग, फुगडीसारखे खेळ आणि अखंड हरिनामाचा गजर अशा भावपूर्ण वातावरणाने आसमंत भरून गेला होता. आबालवृद्ध भाविकांचा मोठा जनसागर माउलींच्या दर्शनासाठी लोटला होता. तुकाराम महारांजाच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी अरूणा चौकाकडुन मंदिराकडे जाणारा रस्ता भाविकांच्या गर्दीने फुलुन गेला होता. दर्शनासाठी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा असल्या तरी दोन्ही रांगा लांबलचक होत्या. सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले होते.
 
लाखो वारकर्‍यांच्या आगमनामुळे संपूर्ण शहर `ग्यानबा तुकाराम’ नामाचा गजरात न्हाऊन निघाले आहे. शहरात बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी पाऊस न आल्याने वारकरी शहरात फिरू शकले. वारकर्‍यांच्या सेवेसाठी हजारो पुणेकर सरसावले होते. विविध संघटना, गणेश मंडळे, व्यापारी, नगरसेवक तसेच राजकीय मंडळीनी पालखीमधील वारकर्‍यांसाठी ठिकठिकाणी अन्नदानासहीत चांगल्या सोयी, सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. अनेक संस्थांच्या वतीने वारकर्‍यांना निवसस्थाने उपलब्ध करून देण्यात आली होती. चहा, अल्पोपहाराची व्यवस्थाही करण्यात आली होती. वारकर्‍यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी फिरते दवाखाने आणि प्रथोमपचार केंद्रही अनेक वैद्यकिय संस्थांनी सूरू केले होती. याठिकाणी वारकर्‍यांना मोफत औषधोपचार करण्यात आले. वारकर्‍यांची नेत्र तपसणी करून त्यांना मोफत चष्म्यांचे वाटपही करण्यात आले.

वारकर्‍यांच्या आनंदात सामील होण्यासाठी शहरवासियांनी, विविध सामाजिक संस्थांनी, राजकीय पक्षांनी वारकर्‍यांची विविध प्रकाराने सेवा करून पुण्य पदरात पाडून घेतले. अनेक हौसिंग सोसायट्यामधून रांगोळीच्या पायघड्या अंथरून वारकर्‍यांचे स्वागत करण्यात आले.

दुपारी दोन्ही पालख्यांचे स्वागत महापौर वैशाली बनकर यांनी केले. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे, आयुक्त महेश पाठक, आमदार उल्हास पवार आदी मान्यवरांनी माउली आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. दरवर्षी पालख्यांचे स्वागत वाकडेवाडी येथील कमलनयन बजाज चौकात केले जाते. यंदा माउलीच्या पालखी मार्गात बदल केल्याने दोन्ही पालख्यांचे एकत्रित स्वागत इंजिअरिंग महाविद्यालयाजवळ असलेल्या पाटील इस्टेट येथे करण्यात आले. पालख्यांच्या स्वागतासाठी महापालिकेतर्फे ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आल्या आहेत.  

पालख्यांचा मुक्काम असलेल्या मंदिर परिसरात सुरक्षाव्यवस्था चोख ठेवण्यात आली होती. पालखी विठोबा मंदिर, निवडुंगा विठोबा मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. पालखी आगमनापासून या कॅमेर्‍यांच्या माध्यमातून पोलिसांनी सुरक्षाव्यवस्था चोख ठेवली आहे.