निकाल लागला, आता लगबग प्रवेशासाठी !

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. आता अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरु झाली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील महाविद्यालयात केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यावर्षी प्रथमच ऑनलाईन निकालाच्या गुणपत्रिकेच्या छायांकित प्रतिवर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज मिळणार आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र जाधव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे आणि पिंपरी चिंववड शहरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयता अकरावीची प्रवेश प्रक्रिया गुरूवारपासून सूरू होणार आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठीचे अर्ज १४ ते १९ जूनदरम्यान शहरातील सर्व महाविद्यालयांमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळात मिळणार आहेत. २० ते २३ जून दरम्यान इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश समितीचे समन्वय केंद्र असलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि पुणे महाविद्यालय कॅम्पस येथे उपलब्ध असतील. तर २५ ते २७ जून दरम्यान हे अर्ज फक्त फर्ग्युसन महाविद्यालयातच मिळतील. आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठीचे प्रवेशअर्ज पूर्वी मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालयात मिळत असत आता मात्र त्यांच्यासाठीचे अर्ज डेक्कन जिमखाना येथील लक्ष्मणराव आपटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

प्रवेश अर्ज मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज विक्री केंद्रावर दहावीच्या ऑनलाईन निकालाची छायांकीत प्रत देणे आवश्यक आहे. एका विद्यार्थ्याला दोन अर्ज विकत घेता येतील. द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र अर्ज उपलब्ध आहेत.  

राज्याबाहेरील बोर्डाच्या विद्यार्थ्यांनाही याच प्रवेश अर्जावर प्रवेश दिला जाणार आहे. अर्जासोबत विद्यार्थ्यांनी कोणतेही मूळ प्रमाणपत्र न जोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही विक्री केंद्रातून खरेदी केलेला अर्ज कोणत्याही स्वीकृती केंद्रावर स्वीकारण्यात येणार असल्याची माहितीही जाधव यांनी दिली.

अकरावी प्रवेशासाठीची गुणवत्ता यादी १९ जुलै रोजी जाहीर होईल
गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना १९ ते २१ जुलै प्रवेश
पहिल्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना २३ व २४ जुलै रोजी प्रवेश
दुसर्‍या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना २५ व २६ जुलै रोजी प्रवेश
एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना २८ ते ३० जुलै रोजी प्रवेश

द्विलक्षी अभ्यासक्रम प्रवेश अर्ज
द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र प्रवेश अर्ज उपलब्ध आहे. द्विलक्षी अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश टेबल ऍडमिशन पद्धतीने होणार आहेत. दोन्ही शहरात ७३ संस्थामध्ये द्विलक्षी अभ्यासक्रम उपलब्ध असून यामध्ये संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल मेन्टेनन्स, स्कूटर – मोटरसायकल रिपेअरिंग आणि जनरल सिव्हील इंजिनिअरिंग अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.  द्विलक्षी अभ्यासक्रमाची गुणवत्ता यादी १ जुलै रोजी आणि अंतिम यादी २ प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही यादी फर्ग्युसन कॉलेज, आबासाहेब गरवारे कॉलेज, एस.पी. कॉलेज, म्हाळसाकांत महाविद्यालय, आकुर्डी आणि नौरोसजी वाडीया महाविद्यालय येथे लावण्यात येणार आहे. अंतिम प्रवेश टेबल पद्धतीने ४ ते ९ जुलै दरम्यान गुणवत्ता यादीतील क्रमांकानुसार  फर्ग्युसन महाविद्यालयात होणार आहेत.

Leave a Comment