मोहोळ आणि भालेराव यांना अटकेला न्यायालयाची परवानगी मात्र प्रतिक्षा मोक्का न्यायालयाची

पुणे, दि. ९ – इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य मोहम्मद कातील सिद्दीकी याचा खून करणारे कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळ आणि आलोक भालेराव यांना अटक करण्याची परवानगी आज न्यायालयाने येरवडा पोलिसांना दिली. पोलिसांनी यासंदर्भात सादर केलेला अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.बी.मुंडे यांनी मंजूर केला. मोक्का न्यायालयांतर्गत परवानगी घेऊन त्या दोघांना अटक करून उद्यापर्यंत न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.

देशभरातील वेगवेगळ्या शहरांत झालेल्या बॉंबस्फोटात सहभाग असल्याच्या कारणावरून सिद्दीकी याला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. त्याच वेळी त्याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ बॉम्ब ठेवल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुणे शहर दहशतवादी विरोधी पथकाच्या पोलिसांनी २मे रोजी सिद्दीकी याला दिल्ली पोलिसांकडून वर्ग करून घेतले. तीन वेळा पोलीस कोठडी वाढवून दिल्यानंतर २८ मे रोजी सिद्दीकीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. त्यानुसार त्याला येरवडा कारागृहातील अंडा जेलमध्ये ठेवण्यात आले होते.

त्याठिकाणी खंडणी, खून, मारामार्‍या, अपहरण असे विविध गुन्हे असलेले आरोपी शरद मोहोळ व आलोक भालेराव या दोघांनाही ठेवण्यात आले होते. त्या दोघांनी किरकोळ कारणावरून शुक्रवारी सकाळी बर्मुड्याच्या नाडीने गळा आवळून सिद्दीकीचा खून केला. त्यामुळे मोहोळ आणि भालेराव यांना सिद्दीकीच्या खुनाच्या गुन्ह्यात वर्ग करण्याविषयीचा अर्ज येरवडा पोलिसांनी सहाय्यक सरकारी वकील ए. के. पाचर्णे यांच्यामार्फत न्यायालयात केला. न्यायालयाने त्यास मंजूरी दिली. मोक्का न्यायालयांतर्गत परवानगी घेऊन  त्या दोघांना अटक करून  उद्यापर्यंत न्यायालयासमोर हजर करण्याची शक्यता असल्याचे  पोलिसांकडून सांगण्यात आले.