नाट्य रसिकांसाठी ‘जोत्स्ना भोळे स्वरोत्सवा’ची पर्वणी

पुणे – विख्यात गायिका आणि नाटय अभिनेत्री जोत्स्ना भोळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सृजन फाऊंडेशन आणि नांदेड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा ‘जोत्स्ना भोळे स्वरत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात नाट्य संगितापासून शास्त्रीय संगीत, वादनाचा समावेश असल्याने नाट्य रसिकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.

येत्या १६ आणि १७ जून दरम्यान टिळक स्मारक मंदिर येथे हा महोत्सव होणार आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पायगुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपाध्यक्ष डी. जी. बर्डे, खजिनदार राजेंद्र शेट्टी आदी उपस्थित होते.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी १६ जून रोजी संध्याकाळी नाट्य संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लिटील चॅम्प प्रथमेश लघाटे, गायक अमोल बावडेकर, शिल्पा पुणतांबेकर, निलाक्षी पेंढारकर यांचा नाट्य संगिताचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी गोव्याचे नाट्य अभ्यासक डॉ. अजय वैद्य निवेदन करणार आहेत. १७ जून रोजी संध्याकाळी शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सुरूवात तुकाराम दैठणकर यांच्या शहनाई वादनाने होणार आहे. त्यानंतर गायिका सुमेधा देसाई यांचे गायन, रुपक कुलकर्णी यांचे बासरी वादन, अभिजीत पोहनकर यांचे सिंथेसायझर वादन, रामदास पळमुळे यांचे तबला वादन आणि कालीनाथ मिश्रा यांचे पखवाज वादन अशी एकत्रित जुगलबंदी रंगणार आहे. या जुगलबंदीनंतर नृत्यांगना शर्वरी जेमनीस आणि ऋतुजा सोमण या कथ्थक नृत्य सादर करणार आहेत. यावेळी नाट्यसंगीत क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल गायक आणि मृदूंगवादक सी. पी. व्यकंटरमण तसेच गायक विष्णू सूर्यवाघ यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या स्वरमहोत्सवाची सांगता पंडित उल्हास कशाळकर यांच्या गायनाने होणार आहे. यावेळी त्यांना तबल्यावर पं. सुरेश तळवळकर तर हार्मोनियमवर पं. अरुण थत्ते हे साथसंगत करणार आहेत.

Leave a Comment