मुंबई/पुणे दि.५-वाहन खरेदी केल्यावर आपल्या गाडीला प्रादेशिक परिवहन कार्यालय देईल तो नंबर घेतला जाण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. गाड्यांसाठी विशिष्ठ नंबरच मागणार्यांची संख्या जशी वाढत चालली आहे तसा परिवहन कार्यालयाचा महसूलही वाढत चालला आहे. कांही जादा रक्कम आकारून असे स्पेशल नंबर कोणत्याही वाहनासाठी घेता येतात मात्र त्यातही कार आणि दुचाकीसाठी असे नंबर घेणार्यांचे प्रमाण अधिक आहे. विशेष म्हणजे या नंबरसाठी आकारल्या जाणार्या जादा दरातून प्रादेशिक परिवहन विभागाची तिजोरीदरवर्षी सरासरी ६ कोटी रूपयांनी श्रीमंत होत असते. आता प्रादेशिक परिवहन विभागाने या विशिष्ठ नंबरसाठीचे शुल्क दुप्पट करण्याचा प्रस्ताव तयार केला असून तो सरकारकडे मंजुरीसाठी दिला आहे. म्हणजे यापुढे विशिष्ठ नंबरचा आग्रह धरणार्यांना दुप्पट पैसे भरावे लागणार आहेत.
प्रादेशिक परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार १, ९९९,७७७७,७८६ अशा नंबरांना अधिक मागणी असते. १ नंबर हवा असेल तर दुचाकी आणि रिक्षांना पंचवीस हजार रूपये जास्त भरावे लागतात तर कारसाठी हीच रक्कम एक लाख रूपये आहे. म्हणजे आता १ नंबर हवा असेल तर कारमालकाला दोन लाख रूपये त्यासाठी मोजावे लागणार आहेत. त्यापाठोपाठ मागणी असलेले नंबर म्हणजे ९,९९,९९९,९९९९,११११,२२२२,३३३३ अशी सिरीज. त्यासाठी कारमालकांना सध्या ५० हजार रूपये जादा मोजावे लागतात ते यापुढे १ लाख रूपये मोजावे लागतील. याचा सरळ अर्थ असाही आहे की प्रादेशिक परिवहन विभागाचा महसूल ६ कोटींवरून १२ कोटी रूपयांवर जाणार आहे.
असे नंबर मागणार्यांचे प्रमाण मुंबईत सर्वाधिक आहे . त्याखालोखाल क्रमांक लागतो पुण्याचा. पुणे प्रादेशिक कार्यालयाने गेल्यावर्षात असे नंबर देऊन सुमारे दोन कोटींचा महसूल गोळा केला होता असेही समजते.