संत निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरकडे

`जय हरी विठ्ठल’च्या गजरात संत निवृत्तीनाथांची पालखी नाशिकमार्गे पंढरपूरकडे रवाना झाली. नाशिक शहर व जिल्ह्यामधून सुमारे १० हजारांपेक्षा जास्त भाविक या दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत. पौर्णिमेच्या दिवशी त्र्यंबकेश्‍वर येथील संत निवृतीनाथ समाधी मंदिरात पूजा-आरती संपन्न झाली. नंतर टाळ मृदूंगाच्या गजरात कुशावर्तावर धार्मिक पद्धतीने मानकरी काण्णव कुटुंबाने पालखीची पूजा केली.

या दिंडीमध्ये वृद्ध वारकर्‍यांबरोबरच तरुणही मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. `ज्ञानोबा माऊली तुकाराम’, `जयजय रामकृष्ण हरी’, `विठ्ठल-विठ्ठल जय हरी विठ्ठल’, अशा नाम गजरात पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. पालखीच्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. देवस्थानचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, हभप गोसावी महाराज, हभप लहवितकर महाराज, चक्रांकित महाराज यांच्यासह परंपरागत दिंडीचे मानकरी या दिंडीत सहभागी झाले आहेत. माजी नगराध्यक्ष पुष्पाताई झोले याही सलग पाचव्या वर्षी या दिंडीत सहभागी झाल्या होत्या.