निर्मिती आणि राणी म्हणणार ‘अय्या’

`गं गूबाई नॉनमॅट्रीक’ आणि `जाऊ बाई जोरात’ या नाटकात धमाल कॉमेडी करणारी निर्मिती सावंत आता `अय्या’ या हिंदी चित्रपटात झळकणार असून, मी या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे, असे तिने सांगितले. एका मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे माझे पहिले सत्र नुकतेच पार पडले.  सचिन कुंडलकरचे दिग्दर्शन असलेल्या `अय्या’ या हिंदी चित्रपटाची मी वाट पाहतेय. याचे चित्रीकरण आम्ही नुकतेच पूर्ण केले आहे. सध्या त्याच्यावर तांत्रिक सोपस्कार सुरू आहेत. रेस्टॉरंट, गंध  यासारख्या सकस चित्रपटांचा दिग्दर्शक म्हणून आपल्याला सचिनची ओळख आहे, त्यामुळेच मलाही या चित्रपटाकडून अपेक्षा आहेत. अनुराग कश्यपने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. राणी मुखर्जीची त्यात प्रमुख भूमिका असून, मी तिच्या आईची व्यक्तिरेखा साकारली आहे. सतीश आळेकर यांनी या चित्रपटात राणी मुखर्जीच्या वडिलांची भूमिका केली आहे, तर सुबोध भावे, अमित वाघ असे बरेच मराठी कलाकार या चित्रपटात आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान राणीशी माझी फारच चांगली गट्टी जमली होती. इतकी की एकदा ती मला म्हणाली की, यापुढच्या माझ्या कोणत्याही चित्रपटात माझ्या आईची भूमिका तुम्हीच करायची. मला वाटले की, माझ्या कामाला तिने दिलेली ही दाद होती, असे निर्मिती सावंत यांनी सांगितले.

Leave a Comment