सरकारी विभागच नियमांना अपवाद

पुणे दि.५- एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक जीवनात वेगळी वागणूक दिली जाऊ नये यासाठी सरकारने सुरू केलेल्या मोहिमेला आता दोन दशकांपेक्षा अधिक काळ लोटला आहे तसेच सरकारने या साठी राबविलेल्या मोहिमा, केलेल्या जाहिराती यावरही कोट्यावधी रूपये खर्च केले आहेत. मात्र असे असले तरी सरकारी विभागातच याबाबत अपवाद केला जात असल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील ४१ वर्षीय बसचालकाला राज्य परिवहन विभागाने एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्यामुळे सरळ कामावरूनच कमी केले आहे. कुटुंबातील एकमेव कमावता असलेला हा चालक त्यामुळे अडचणीत आला आहेच पण त्याच्या मुलाचे शिक्षणही त्यामुळे बंद पडले असून हा मुलगा सध्या सुरक्षारक्षक म्हणून काम करत आहे असे समजते.

या बसचालकाने केलेल्या आरोग्य तपासणीत २००८ सालातच त्याला एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे समजले हते. त्यामुळे अशक्त बनलेल्या या चालकाने आपल्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका नको म्हणून परिवहन विभागाला आपल्या आजाराची कल्पना देऊन बस चालविण्याऐवजी अन्य कोणतेही काम द्यावे अशी विनंतीही केली होती. सरकारी रूग्णालय असलेल्या ससूननेही हा इसम अवजड वाहन चालविण्यास सक्षम नसल्याचे प्रमाणपत्र दिले होते मात्र परिवहन विभागाने त्याला कामावरून कमी करण्याचाच निर्णय घेतला.

याविषयी विभागीय नियंत्रकांकडे चौकशी केली असता त्यांनी आमच्या नियमानुसार अपघात अथवा अन्य कारणाने व्यक्ती ४० टक्के अपंग बनली असेल तरच त्याला डेस्क जॉब देता येतो अशी तरतूद असल्याचे सांगितले. मात्र सरकारी नियमानुसार एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तीकडून इतरांना संसर्गाची शक्यता नसेल तर त्याला कामावरून कमी करता येणार नाही असे निर्देश आहेत त्याचे काय? याचे उत्तर मात्र या अधिकार्‍यांनी दिले नाही.