काँग्रेस- समाजवादीची जवळीक अधिक दृढ होत असल्याचे संकेत

 समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यांचे आघाडी सरकारमध्ये वाढत चाललेले प्रस्थ हा चर्चेचा विषय असतानाच काँग्रेसनेही समाजवादी पक्षाला गोंजारणे अधिक पसंत केले असल्याचा आणखी एक पुरावा नुकताच समोर आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेख यादव यांची पत्नी डिंपल कनौज मतदारसंघातून लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरत असतानाच काँग्रेसने तिच्या विरोधात उमेदवार उभा न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. २४ जून रोजी ही निवडणूक होत आहे. अखिलेश यादव यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे ही जागा रिकामी झाली आहे.

उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष रितू बहुगुणा यांना या विषयी विचारले असता त्यांनी सांगितले की २००९ सालच्या निवडणूकीतही काँग्रेसने येथे उमेदवार उभा केलेला नव्हता त्यामुळे आत्ता उभा करण्याचा प्रश्न येत नाही. मात्र त्याचवेळी २००९च्या लोकसभा पोटनिवडणुकीतच फिरोजाबाद मतदारसंघात याच डिंपल यादव यांच्याविरोधात काँग्रेसने राज बब्बर यांना तिकीट दिले होते. राहुल गांधी यांनी त्यावेळी जोरदार प्रचार करून राज बब्बर यांना निवडूनही आणले होते व त्यामुळे काँग्रेस आणि समाजवादीमधील संबंध ताणलेही गेले होते. समाजवादी पक्षाने आजपर्यंत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात अनुक्रमे रायबरेली आणि अमेठीत कधीही उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे डिंपल विरोधात उमेदवार देऊन डिंपल यांचा पराभव केल्याबद्दल समाजवादीत राग होता. मात्र राजकारणात कोणीच कोणाचा कायम शत्रू वा मित्र असत नाही या नियमानुसार आता मात्र काँग्रेसने डिंपल यांच्या विरोधात उमेदवार न देण्याची आणि समाजवादीशी वाढत असलेल्या जवळीकीचीच जणू पावती दिली आहे.

Leave a Comment