एक कोटीचा निधी देण्याची मागणी

पंढरपूर, दि. ४ – राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील येत्या ११ जून रोजी पंढरपूर दौर्‍यावर येत आहेत. राष्ट्रपतीचा हा दौरा लक्षात घेउन पंढरपूर शहरातील रस्ते दुरूस्तीसाठी शासनाने त्वरित एक कोटी रूपयांचा निधी पंढरपूर नगर परिषदेस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील पहिल्यांदाच पंढरपूर दौर्‍यावर येत आहेत. आपल्या दौर्‍यात त्या श्रीविठ्ठल दर्शन घेणार आहेत. या दौर्‍यात राष्ट्रीय वारकरी एकात्मता सर्वोदय संमेलनाचे उद्घाटन, ब्रह्मविद्याधाम प्रतिकृतीचे उद्घाटन करणार आहेत. पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने राष्ट्रपतींना मानपत्र देण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आ.भारत भालके, नगराध्यक्ष उज्वला भालेराव, सर्वोदय संमेलनाचे अध्यक्ष आबा कांबळे उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रपतींच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन यंत्रणा कामाला लागली आहे. प्रशासकीय स्तरावर दोन बैठका घेण्यात आल्या असून अधिकार्‍यांना कामाबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. पंढरपूर नगरपरिषदवतीने अतिक्रमण हटविणे व रस्ते दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. रस्ते दुरूस्तीसाठी नगरपरिषदेच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे दुरूस्तीची कामे उधारीवर सुरू असल्याची चर्चा नगरसेवकांमध्ये होत असून नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्ष उज्वला भालेराव यांनी शासनाकडे एक कोटी रूपयांची मागणी केली आहे.

पंढरपूरातील रस्ते अतिशय खराब झाले असून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील १२ रस्त्यांसाठी पाच कोटी ६० लाख रूपयांची तरतुद करण्यात आली असून आतापर्यंत तीन ते पाच रस्त्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या रस्त्यांचे काम निष्कृष्ट दर्जाचे झाले असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.