पुढील वर्षी उसाची टंचाई जाणवणार

पुणे दि. ४ – यंदा राज्यात सन २०११-१२ च्या गळीत हंगामात १७० साखर कारखान्यांतून ७७० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले असून ८९ लाख मेट्रिक टन साखर उत्पादित झाली आहे. २६ लाख मेट्रिक टन साखर शिल्लक राहणार आहे. सध्या दुष्काळ असल्यामुळे लागणीचा उसाचा वापर जनावरांच्या चार्‍यासाठी करण्यात येत असल्यामुळे पुढील वर्षी उसाची टंचाई जाणवणार आहे.

राज्यात सन २०११-१२ च्या गळीत हंगामात १२१ सहकारी व ५० खाजगी साखर कारखान्याच्या माध्यमातून १० मे अखेर गळीत हंगाम पूर्ण करण्यात आला. या हंगामात ८०० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप अपेक्षित धरण्यात आले होते. परंतु परतीच्या पावसाने झटका दिल्यामुळे उसाच्या उत्पादनात घट झाली. एकूण ७७० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होवून ८९ लाख ५४ हजार लाख मे. टन साखर उत्पादित करण्यात आली. २६ लाख मे. टन साखर शिल्लक राहणार आहे. त्यामुळे यावर्षी देशांतर्गत साखरेचा दर स्थिर राहणार असल्याचा अंदाज साखर तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे यावर्षी उसाला १८०० ते २००० रूपये प्रतिटन दर मिळाला आहे.

राज्यातील ५५ साखर कारखान्यांमार्फत सहवीज प्रकल्प उभा करण्यात आला आहे. या माध्यमातून ५०० मेगावॅट वीज उत्पादित करण्यात आली आहे. सध्या या वीजेला प्रति युनिट चार रू. ७९ पैसे शासन दर देत आहे. शासनाकडे कारखान्यांनी सहा रूपये २६ पैसे दर द्यावा, अशा मागणीचा प्रस्ताव दिला आहे.

पुढील वर्षीच्या हंगामात उसाचे उत्पादन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पुढील वर्षी उसाची कमतरता जाणवणार आहे. दराबाबत कारखान्यामध्ये स्पर्धा लागणार असल्याचे चित्र निर्माण होणार आहे.