पॉवरग्रीडला ३२५५ कोटी रूपये नफा

मुंबई, दि. ३१ – प्रतिष्ठेचा नवरत्न दर्जा लाभलेली केंद्रीय वीज पारेषण कंपनी, पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने जानेवारी ते मार्च २०१२ दरम्यानच्या तिमाहीत २,०३२ कोटी रूपये निव्वळ नफा कमावला. आधीच्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने ७५१ कोटी रूपये नफा कमविला होता. ३१ मार्च २०१२ रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने उलाढालीतून एकूण ३,४०९ कोटी रूपये उत्पन्न मिळविले. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने २,५८० कोटी रूपये उत्पन्न मिळविले होते. कंपनीच्या उत्पन्नातदेखील ३२ टक्के वाढ झाली आहे. २०११-१२ या संपूर्ण आर्थिक वर्षात पॉवरग्रीड कंपनीने १०,७८५ कोटी रूपये उलाढाल करून त्यावर १९ टक्के वाढीने ३,२५५ कोटी रूपये निव्वळ नफा कमविला. आधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत कंपनीच्या उलाढालीत १९ टक्के; तर निव्वळ नफ्यात २१ टक्के वाढ झाली. कंपनीने २०११-१२ आर्थिक वर्षासाठी आठ टक्के अंतरिम लाभांश जाहीर केला असून अंतिम १३.१ टक्के लाभांशाची शिफारस केली आहे. आधीच्या वर्षात कंपनीने एकूण १७.५ टक्के लाभांश दिला होता.

मार्च २०१२ पर्यंत कंपनीची कार्यान्वित मालमत्ता १४,१०० कोटी रूपये होती. मागील वर्षी कंपनीच्या आंतरविभागीय वीज पारेषण क्षमतेमध्ये ५,६०० मेगावॅट वाढ करण्यात आली होती. परिणामी कंपनीची एकूण नॅशनल ग्रीड आंतरविभागीय वीज पारेषण क्षमता २८,००० मेगावॅट झाली. पॉवरग्रीड कंपनी, अकराव्या योजनेतील ५५ हजार कोटी रूपयांचे गुंतवणूक उद्दिष्ट पार करणारी भारतीय ऊर्जा क्षेत्रातील एकमेव कंपनी आहे. याशिवाय, पॉवरग्रीडने बाराव्या योजनेत एक लाख कोटींची भांडवली गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे. त्यापैकी २०,००० कोटी रूपयांची गुंतवणूक २०१२-१३ या आर्थिक वर्षात करण्यात येणार आहे.