राज्याच्या मुख्य सचिवपदी जयंतकुमार बाँठीया

मुंबई – राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव जयंतकुमार बाँठीया यांनी गुरूवारी राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे हाती घेतली. मावळते मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी सायंकाळी बाँठीया यांच्याकडे सूत्रे सुपूर्द केली. यावेळी राज्याच्या प्रत्येक क्षेत्रात ई-गव्हर्नन्सची अंमलबजावणी करण्यास आपले प्राधान्य राहील. हे पद फार जबाबदारीचे असून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा आपण प्रयत्न करू, असे बॉठीया यांनी सांगितले.

जयंतकुमार बाँठीया यांनी कानपूर विद्यापीठातून रसायनशास्त्रात एमएस्सी ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून डेमॉग्राफीमध्ये एमएस्सी केली आहे. उस्मानाबाद व बीडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, नागपूर व भंडार्‍याचे जिल्हाधिकारी, केंद्रीय जणगणना विभागाचे संचालक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त, प्रधान सचिव आणि शेवटी अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम केले आहे. मुख्य म्हणजे १ जूनला बाँठीया यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्यासाठी ही वाढदिवसाची भेट ठरली असल्याचे मानले जात आहे. त्यांच्याकडे संपूर्ण एक वर्षाचा कार्यकाल असणार आहे.

Leave a Comment