अखेर कोलकताने आयपीएल बाजी मारली !!!

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात कोलाकाताने पाच विकेट आणि दोन चेंडू राखून विजय मिळविला.शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला थरार , कोलकात्याच्या मनविंदर बिसलाने ४८ चेंडूत पाच षटकार व आठ चौकारांसह चोपून काढलेल्या ८९ धावा हे कोलकात्याच्या डावाचे वैशिष्ट्य ! यामुळे १९१ धावांचे आव्हान कोलकात्याने १९ . ४ षटकांत पार केले . यंदा प्रथमच कोलकात्याने आयपीएलच्या बाद फेरीत प्रवेश केला आणि या पहिल्याच खेपेत त्यांनी जेतेपदावर दिमाखात नावही कोरले हे विशेष !
अखेरच्या षटकात कोलकात्याला ११ धावांची आवश्यकता होती . ढोणीने चेन्नईसाठी लकी असलेल्या ब्राव्होच्या हातात चेंडू सोपविला . पहिल्या दोन चेंडूंवर त्याने दोन धावा दिल्या , पण तिसऱ्या व चौथ्या चेंडूवर चौकार खेचत मनोज तिवारीने कोलकात्याचा विजय साकारला . प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई १९१ धावांचे आव्हान उभारले तेव्हा जाणकारांसह अनेकांनी चेन्नईच हॅट् – ट्रिक करणार असा ‘ कौल ‘ दिला होता .

अभल्यामोठ्या आव्हानासमोर कोलाकाताची प्रमुख मदार फॉर्मात असलेला कर्णधार गौतम गंभीरवर होती पण हिल्फेनहॉसने पहिल्याच षटकात गंभीरच्या यष्टी उखडल्या तेव्हा चेन्नईच्या पाठीराख्यांचा जल्लोष टिपेला पोहोचला होता, तर केकेआरच्या पाठीराख्यांमध्ये सामसूम झाली होती. पण बिसलाने हार मानली नव्हती. शेंटी तुटो वा पारंबी अशा थाटात त्याने त्याने हल्ला सुरू केला. चेन्नईच्या गोलंदाज गंभीरला बाद करण्याच्या आनंदातून बाहेर येण्याच्या आतच त्याने अल्बी मॉर्कलच्या एकाच षटकात चार चौकारांसह तब्बल 20 धावा फटकावल्या आणि तेथूनच सामन्याची रंगत वाढत गेली.

बिसलाची फलंदाजी इतकी मंत्रमुद्ध करणारी होती की त्याने कोणाचाही पर्वा केली नाही, मॉर्कल, अश्‍विन, ब्रावो असे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनुभवी गोलंदाज पण त्यांचीही बेदम धुलाई त्याने केली. आव्हान कायम ठेवण्यासाठी प्रत्येक षटकामागे किमान नऊ धावांच्या सरासरीने धावां करणे गरजेचे होते विशेष म्हणजे ही गरज त्याने पूर्ण केली. समोर कोणताही गोलंदाज आला तरी बिसलाला त्याची पर्वा नव्हती त्याची बॅट चौकार आणि षटकाराचीच भाषा बोलत होती. बिसलाला कसे रोखायचे याचे कोडे पडलेले असताना मॉकर्लने 15 व्या षटकांत बिसलाला बाद केले. त्यानंतर कॅलिसने आपला दाणपट्टा सुरू
केला त्यावेळी चेन्नईची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी होती.

संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज ः 20 षटकांत 3 बाद 190 (माईक हसी 54 -43 चेंडू, 4 चौकार, 2 षटकार, मुरली विजय 42 -32 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार, सुरेश रैना 73 – 38 चेंडू, 3 चौकार, 5 षटकार, महेंद्रसिंग धोणी नाबाद 14 -9 चेंडू, 2 चौकार, शकिब अल हसन 3-0-25-1, सुनील नारायण, जॅकस्‌ कॅलिस 4-0-34-1, रजत भाटिया 3-0-23-1)

कोलाकाता नाईटराडयर्स ः 19.4 षटकात 5 बाद 192 (गौतम गंभीर 2, मनविंदर बिसला 89 – 48 चेंडूत 8 चौकार व 5 षटकार, जॅकस्‌ कॅलिस 69 – 49 चेंडूत 7 चौकार व 1 षटकार, लक्ष्मीरतन शुक्‍ला 3, युसुफ पठाण 1, शकीब अल हसन नाबाद 11 – 7 चेंडूत 1 चौकार, मनोज तिवारी नाबाद 9 – 3 चेंडूत 2 चौकार, बेन हिल्फेनहॉस 4-0-25-2, ऍल्बी मॉर्कल 4-0-38-1, आर. अश्‍वीन 4-0-41-1, द्वेनी ब्राव्हो 3.4-0-49-1, शदाब जकाती 4-0-38-0)