वाचकांना उत्सुकता ‘हिंदू’ कादंबरीच्या पुढच्या भागाची

पुणे  – ‘हिंदू’ कादंबरीमध्ये अशा काही जागा आहे की ज्यामधून वादाचा धुरळा उडणार हे मला ठाऊक आहे. परंतु, एक-दोन वर्षांत हा धुरळा खाली बसेल आणि कादंबरीचे अस्सल रुप लोकांच्या लक्षात येईल… हा आत्मविश्‍वास व्यक्त करणारे भालचंद्र नेमाडे यांनी बहुचर्चित ‘हिंदू’ कादंबरीच्या पुढील तीन कादंबर्‍यांचे मसुदे लिहून ठेवले आहेत; परंतु समाधान होत नाही तोपर्यंत ते बाहेर काढू नयेत, अशीच त्यांची भूमिका आहे. मात्र, असे असले तरी वाचकांना उत्सुकता आहे ती ‘हिंदू’च्या पुढच्या भागाची.

वयाच्या पंचविसाव्या वर्षीच ‘कोसला’च्या माध्यमातून कादंबरीचा पैस मांडणारे आणि ‘हिंदू’ या कादंबरीतून जगण्याची समृद्ध अडगळ समर्थपणे हाताळणारे ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे रविवारी (दि.२७) अमृतमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहेत. त्याचबरोबर कोसला या अभिजात कलाकृतीचे सुवर्णमहोत्सवी वर्षातील पदार्पण असा दुहेरी योगदेखील  जुळून आला आहे. ‘जरीला’, ‘बिढार’, ‘झूल’ आणि ‘हूल’ या कादंबर्‍यांसह त्यांचे ‘मेलडी’ आणि ‘देखणी’ हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘टीकास्वयंवर’, ‘साहित्याची भाषा’, ‘तुकाराम’ यांसह ‘द इन्फ्लुअन्स ऑफ इंग्लिश ऑन मराठी – ए सोशिओलिंग्विस्टिक अँड स्टायलिस्टिक स्टडी’ आणि ‘इंडो-एंग्लिश  रायटिंग’ हे समीक्षाग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या ‘टीकास्वयंवर’ या समीक्षाग्रंथास साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला आहे. हिमाचल प्रदेश राज्य सरकारने केलेल्या शिफारसीमुळे गेल्या वर्षी त्यांना पद्मश्री या किताबाने गौरविण्यात आले होते.

‘हिंदू’ या चार भागातील कादंबरीविषयी एका मुलाखतीमध्ये भालचंद्र नेमाडे म्हणाले, ‘‘या कादंबरीचा पुढचा भाग आजच्या वर्तमानाशी जोडला गेला आहे. यामध्ये हिंदुत्ववाद, स्त्रीवाद, जातिविचार अशी सूत्रे घेतली आहेत. कादंबरीचा नायक पुरातत्वाचा अभ्यासक आहे. मी इतिहासात रमणारा नाही. खरे तर, इतिहासाचा शत्रूच आहे. मात्र, कादंबरी लेखन करताना आपल्याला सापडलेल्या सत्यापर्यंत पोहोचेन याची काळजी घेतली आहे.’’

भालचंद्र नेमाडे यांच्याविषयी बोलताना ‘ताम्रपट’कार रंगनाथ पठारे म्हणाले, ‘‘नेमाडे हे आत्मशोध घेणारे लेखक आहेत. सार्वकालिक सत्याचा शोध घेण्यासाठी कितीही काळ थांबण्याची त्यांची तयारी आहे. अठरा पगड जातीच्या लेखकांसाठी त्यांनी कादंबरी लेखनाचे रस्ते खुले केले. प्रत्यक्ष कादंबरी लिहून आणि साहित्य-संस्कृतीविषयक भूमिका घेऊन त्यांना कादंबरी वाङमयाविषयीचा बदल घडवून आणला हे त्यांचे योगदान कुणालाही नाकारता येणार नाही.’’

Leave a Comment