दहशतवाद्यांच्या प्रतिकारासाठी एनडीए सज्ज

पुणे, दि. २२ – दहशतवादी हल्ल्यांची शक्यता ध्यानात घेऊन राष्ट्रीयसंरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) सुरक्षेसाठी सदैव सज्ज असल्याचे प्रबोधिनीचे प्रमुख कमांडंट लफ्टनंट जनरल जतिंदर सिंग यांनी सांगितले. मात्र, संरक्षणासाठी कोणत्या उपायोजना केल्या आहेत हे सांगू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एनडीए ही देशातील संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची संस्था दहशतवाद्यांच्या रडारवर आहे. त्याचप्रमाणे संस्थेवर अतिरेकी हल्ले करण्यासाठी दहशतवाद्यांनी रेकी केली असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना लेफ्टनंट जनरल जतिंदर सिंग यांनी आम्ही सुरक्षेसंदर्भात सज्ज असल्याचे स्पष्ट केले.

जतिंदर सिंग म्हणाले, एनडीए या महत्त्वाच्या संस्थेवर हल्ला केला म्हणजे आपली दखल घेतली जाते, अशी दहशतवादी हल्ले करणार्‍या संघटनांची समजूत आहे. त्यामुळे एनडीए अतिरेक्यांच्या रडारवर अशा स्वरुपाचे प्रयत्न वेगवेगळ्या संघटना सातत्याने करीत असतात. अर्थात या स्वरुपाच्या बातम्या बाहेरुनच येत आहेत. प्रबोधिनीतर्फे यासंदर्भात कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. मात्र, एनडीएच्या सुरक्षेसंदर्भात योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.

प्रबोधिनीतील स्नातकांना अद्ययावत प्रशिक्षण देण्यासाठी आणखी पाच सुपर डिमोना ही लढाऊ विमाने लवकरच एनडीएच्या ताफ्यामध्ये दाखल होणार आहेत. त्याचप्रमाणे नौदलामध्ये जाऊ इच्छिणार्‍या स्नातकांना आधुनिक प्रशिक्षण देणारी बोट दोन-तीन महिन्यांत येईल, असेही जतिंदर सिंग यांनी स्पष्ट केले.

पुणे विद्यापीठाची बी. ई. पदवी
एनडीएतील स्नातकांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची बी.एस्सी. आणि बी.ए. पदवी प्रदान केली जाते. मात्र, ज्या स्नातकांचा कल अभियांत्रिकी शाखेकडे आहे त्यांना पुणे विद्यापीठाची संलग्नता असलेली बी.ई. आणि मानव्यशास्त्राच्या स्नातकांना बी.ए. पदवी मिळावी यासाठी पुणे विद्यापीठाबरोबर चर्चा सुरू आहे. अभियांत्रिकी शाखेचा अभ्यासक्रम चार वर्षांचा असल्याने येथील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्नातक पुढील प्रशिक्षणासाठी जेथे जातील तेथे अखेरचे वर्ष पूर्ण करतील. यासाठी अखिल भारतीयतंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) तत्वतः मान्यता दिली आहे. पठडीबद्ध शिक्षणपद्धतीतून एनडीए बाहेर पडावी हा त्यामागचा उद्देश असल्याचे जतिंदर सिंग यांनी सांगितले.