ने मजसी ने…

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना एकदा लंडनमधून फ्रान्सला जावे लागले. तिथे गेल्यानंतर त्यांना आपल्या मातृभूमीची तीव्रतेने आठवण झाली. ते फिरत फिरत समुद्राच्या किनार्‍यावर आलेले असताना त्यांना समुद्राकडे पाहून हा समुद्र आपल्याला लवकरात लवकर मायदेशी नेईल का, असा प्रश्‍न पडला. मातृभूमीच्या प्रेमाचे पाझर त्यांच्या अंत:करणातून सुरू झाले आणि त्यातूनच त्यांची अजरामर अशी कविता साकार झाली. ‘ने मजसी ने परत मातृभूमी सागरा प्राण तळमळला’. सावकरांचा प्राण परदेशातून मायदेशी येण्यासाठी तळमळला होता. परंतु आपल्या देशातल्या अनेक डॉक्टरांचा प्राण मायदेशातून परदेशी जाण्यासाठी तळमळायला लागला आहे आणि आपल्या देशातले अनेक तरुण इंजिनिअर आणि डॉक्टर्स सागराकडे अशी प्रार्थना करायला लागले आहेत की, ‘ने मजसी ने लवकर अमेरिकेला, सागरा प्राण तळमळला.’ उत्तम राहणीमान, छान पगार आणि चांगले भवितव्य अशा कल्पनेने भारलेली ही तरुण पिढी आपल्या मागे या भारत भूमीचे काय होत आहे याचा विचार करायला कोणी तयार नाही. म्हणूनच भारतामध्ये डॉक्टरांची चणचण भासायला लागली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री गुलाब नबी आझाद यांनी लोकसभेत या संबंधात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना,  भारतातले किती डॉक्टर्स परदेशात जाऊन स्थायिक झाले आहेत याची आकडेवारीच दिली. हे डॉक्टर भारतातली वैद्यकीय पदवी मिळवली की, उच्च शिक्षणासाठी म्हणून अमेरिकेला किंवा ब्रिटनला जातात आणि तिथले शिक्षण झाल्यानंतर भारतात परत येण्याच्या ऐवजी तिथेच नोकरी पत्करतात. तिथे पैसाही चांगला मिळतो आणि नोकरीही मिळते. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया अशा या देशांमध्ये काही अपवाद वगळता वैद्यकीय शिक्षण फार काही चांगले मिळत नाही. भारतातून उठून तिकडे जावे आणि आवर्जून तिथलेच शिक्षण घ्यावे असे त्या शिक्षणात काहीही नाही. मात्र परदेशाच्या आकर्षणापोटी ही मंडळी तिकडे जात असतात. आपल्या देशातली घाण, अनारोग्य इत्यादी गोष्टींना आपण कंटाळलो आहोत असे सांगत ही मंडळी तिकडे पळायला लागतात. वास्तविक पाहता त्यांनी परत यावे अशी अपेक्षा असते. परंतु ते तिकडेच राहतात आणि भारतात मात्र डॉक्टरांची कमतरता जाणवायला लागते. हा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू आहेच पण तो आगामी काळामध्ये आणखी मोठ्या प्रमाणावर सुरू राहील.

यामागचे कारण असे की, हे सर्व पुढारलेले, श्रीमंत, पाश्‍चात्य देश वैद्यकीय दृष्टीने दुहेरी अडचणीत सापडलेले आहेत. पहिली अडचण म्हणजे त्यांची लोकसंख्या घटायला लागली आहे. त्यामुळे लोकसंख्येत तरुण मुले कमी आहेत. परिणामी डॉक्टर कमी पडायला लागले आहेत. लोकसंख्येतले वृद्धांचे प्रमाण वाढत आहे. वृद्धांच्या मुख्य समस्या प्रामुख्याने आरोग्याच्या असतात. त्यामुळे एका बाजूला नवे डॉक्टर तयार होत नाहीत आणि दुसर्‍या बाजूला डॉक्टरांची गरज मात्र वाढत चालली आहे. म्हणूनच एखादा भारतीय, पाकिस्तानी किंवा आशिया खंडातल्या कोणत्याही देशातला हुशार, तरुण डॉक्टर अशा देशात स्थायिक होण्याची भावना व्यक्त करतो तेव्हा तिथली सरकारे त्यांना तिथे राहण्यास प्रोत्साहन देतात. मात्र असे डॉक्टर ज्या देशात जन्मलेले आहेत आणि त्यांचे शिक्षण ज्या देशातल्या सरकारकडून झालेले आहे त्या देशातही डॉक्टरांची चणचण असते याची त्यांना काळजी नाही. भारतातले ३ हजारावर डॉक्टर्स केवळ एकाच वर्षात अमेरिकेत जाऊन स्थायिक झालेले आहेत. अशा डॉक्टरांना तिथे स्थायिक होऊन व्यवसाय करता येऊ नये आणि त्यांना व्यवसायासाठी भारतातच परत यावे लागावे अशी काही तरी कायद्याची तरतूद करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे.

भारतातला एखादा डॉक्टर परदेशात उच्च शिक्षणासाठी जात असेल तर त्याला तिकडे जाताना बॉण्डवर सही करणे सक्तीचे करावे. परदेशातले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण भारतात परत येऊ असे वचन त्या बॉण्डमध्ये समाविष्ट केलेले असावे. तेव्हा परदेशात जाऊन राहणारे हे डॉक्टर परदेशात राहतात तेव्हा त्यांच्याकडून वचनाचा भंग झाला आहे असे जाहीर केले जावे. ते ज्या देशात जाऊन स्थायिक होतील आणि व्यवसाय करतील त्या देशात व्यवसाय करण्यापूर्वी त्यांना तिथल्या सरकारला भारत सरकारचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे लागावे अशा तरतुदी करण्याचा विचार भारत सरकार करत आहे आणि तो योग्य आहे. कारण भारतामध्ये दरसाल हजारो डॉक्टर्स नव्याने तयार होत असून सुद्धा भारतीयांची डॉक्टरांची गरज भागत नाही. ग्रामीण भागामध्ये हजारो लोकांमागे एखादाही डॉक्टर नसतो. भारतामध्ये असे काही खेडूत लोक आहेत की ज्यांनी आपल्या आयुष्यात कधी डॉक्टर नावाचा प्राणी पाहिलेला नाही. आपल्या देशाची अवस्था अशी बिकट असताना केवळ जास्त पैसे कमवण्याच्या प्रलोभनाने भारतातले लोक परदेशात जात असतील तर तो देशाशी द्रोहच ठरेल. तेव्हा अशा मनुष्यबळाच्या स्थलांतराला अटकाव केलाच पाहिजे.

Leave a Comment