
साना, दि. २२ – येमेनची राजधानी सानामध्ये लष्करी वेशातील एका आत्मघातकी बॉम्बरने घडवून आणलेल्या भीषण स्फोटात १०० हून अधिक सैनिक ठार झाले असून या स्फोटामध्ये २२० लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. बॉम्बस्फोटाची ही घटना सोमवारी घडली असून येमेनच्या सैनिकांवर झालेला आतापर्यंतचा हा सर्वात भीषण हल्ला मानला जात आहे. येमेनमधील अल काईदाच्या सदस्यांनी हा स्फोट घडविल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी या हल्ल्याचा निषेध करून येमेनमधील सर्वांनी हिंसाचाराचा त्याग करावा, असे आवाहन केले आहे.
