न्यू यॉर्क दि.२१-एक महिन्यांच्या राजकीय लढाईनंतर चीनमधील अंध वकील आणि सामाजिक कार्यकर्ते चेन गुंगचेंग अखेर न्यूयॉर्कमध्ये सहकुटुंब पोहोचले आहेत. चीन सरकारच्या स्थानबद्धतेतून नाट्यमय सुटका करून घेतल्यानंतर गेले महिनाभर चेन यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला मात्र अखेर अमेरिकेच्या मध्यस्तीनंतर ते सुखरूपपणे अमेरिकेत येऊन पोहोचले.
अमेरिकन दूतावासात आश्रय घेतलेल्या चेन यांना चीनमध्येच रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे शनिवारी त्यांना त्वरीत चीन सोडून जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर अमेरिकी विमानाने त्यांचे व त्यांची पत्नी आणि दोन मुलांचे नेवार्क लायब्ररी इंटरनॅशनल विमानतळावर आगमन झाले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी न्यूयॉर्क विद्यापीठातील अनेकांनी विमानतळावर हजेरी लावली होती. चेन मॅनहटन ग्रीनव्हिलेज येथे राहणार आहेत आणि लॉ स्कूल जॉईन करणार आहेत असे सांगण्यात आले आहे.
आपल्या स्वागतासाठी जमलेल्या जमावासमोर भाषण करताना चेन यांनी मनापासून आणि हृदयापासून समाजकल्याणासाठी केलेली कोणतीही गोष्ट सिद्धीस जातेच असे सांगितले. समाजाच्या कल्याणासाठी आणि अन्यायाविरोधात लढण्यासाठी आपले बाहू कायम सरसावलेलेच असले पाहिजेत असे सांगून ते म्हणाले की गेली सात वर्षे त्यांना एकही दिवस विश्रांती मिळालेली नाही. त्यामुळे येथे कांही काळ ते मनाला आणि तनाला आराम देणार आहेत. आपल्या सुटकेबद्दल त्यांनी चीन, अमेरिका सरकारचे आभार मानतानाच स्वित्झरलंड, कॅनडा, फ्रान्स दूतावासांचेही आभार मानले.